जळगाव : अयोध्यानगरातील कासार मंगल कार्यालयाजवळ चोरट्यांनी रविवार रोजी बंद घर फोडून दिड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. तक्रार दिल्यावर पोलिस आले. त्यांनी पाहणी केली, तक्रार घेतली मात्र या प्रकरणी दोन दिवस उलटून देखील गुन्हाच दाखल नसल्याने एफआयआर’ची प्रत घेण्यास गेलेल्या रहिवाशाला धक्काच बसला होता. दरम्यान, आज गुरूवारी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
अयोध्यानगरातील चंद्रशेखर नामदेव पाटील रविवारी दुपारी बाराला कुटुंबीयांसह अजिंठा येथे पिकनीक साठी गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास घरी परत आल्यावर घरामागील स्वयंपाक घराचे दाराचा कडीकोयंडा तुटेलला आढळून आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते, तर वरच्या मजल्यावर खोलीतील कपाटाचे साहित्य उपसून चोरट्यांनी दहा हजार रुपये रोख आणि हजार रुपये सोन्याचे दागिने असा 1 लाख 45 हजा रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. पाटील यांनी रविवारी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथक घटनास्थळी दाखल झाले, स्थळाची पाहणीही त्यांनी केली. मंगळवारी पाटील पोलिस ठाण्यात गुन्ह्यात एफआयआर’ची प्रत घेण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांना दोन दिवसांनंतरही गुन्हाच दाखल केला नसल्याची माहिती देण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला. तक्रार दिल्यावर चौकशी अंती औद्योगीक वसाहत पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल गुन्ह्याचा तपास करीत आहे.