अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवार रोजी अयोध्या दौऱ्यावर असून तिथे त्यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु सुरक्षेच्या कारणामुळे तिथे जाहीर सभा घेण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे साधू-महंतांच्या भेटीगाठी, शरयू नदीच्या तिरावर आरती आणि रामजन्मभूमीचे दर्शन असा त्यांचा कार्यक्रम होणार आहे.
उद्धव ठाकरे आज, २४ आणि उद्या, २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांचे लक्ष्मण किला भेट, शरयू नदीच्या तिरावर राम आरती, साधू-महंतांचे आशीर्वाद असे कार्यक्रम होणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी ते शिवसैनिकांना एका जाहीर सभेच्या माध्यमातून मार्गदर्शनही करणार होते. जाहीर सभेची जागा कुठे असावी, तिथे व्यासपीठ किती मोठे असावे असे सर्व नियोजन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे ऐनवेळी उद्धव यांच्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे स्थानिक प्रशासनाने नाकारले. परवानगी नाकारण्याआधी त्यांनी ज्या ठिकाणी जाहीर सभा होणार होती ती जागा कशी आणि किती संवेदनशील आहे याची माहितीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.