नवी दिल्ली: राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी निकाल दिला. वादग्रस्त जमीन ही रामलल्ला तर पाच एकदार जागा ही मशिदीसाठी देण्यात आली आहे. दरम्यान अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने या निकालाबाबत फेरविचार करण्यासाठी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करणार आहे. निकालातून जागेसंदर्भात कोणताही न्याय झालेला नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोर्डाने सांगितले आहे. लखनऊमध्ये बोर्डाची आज रविवारी बैठक पार पडली.
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. वादग्रस्त जागेवर ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्यात यावे. तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याची जागा देण्यात, असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला निकाल देताना दिले होते.