नवी मुंबई : उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज खासदार म्हणून संसदेतील शेवटचा दिवस होता. संसदेतील या शेवटच्या दिवशी सर्वांना रामराम करताना, सबका साथ, सबका विकास असे म्हणत उत्तर प्रदेशाचा उत्तम विकास करण्याची ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी सभागृहाला दिली. मात्र, त्याचवेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय उत्तर प्रदेशातील मतदारांना खूश करण्याच्या हेतूनेच घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. रामायण संग्रहालयासाठी तब्बल 25 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकार बनवत असलेल्या अयोध्येतील रामायण संग्रहालयासाठी मोफत जमीन देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 25 एकर जमीन देण्यात येणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. दरम्यान, अयोध्येत उभारण्यात येणार्या रामायण संग्रहालयाचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मोफत जमीन देण्याच्या घोषणेबाबत विशेष म्हणजे, आज मंगळवारीच राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यामुळेही योगी आदित्यनाथ यांच्या रामायण संग्रहालयासाठीच्या जमीन भूसंपादनाच्या निर्णायची विशेष चर्चा रंगली.