नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीवर पूजा करण्याची परवानगीची एक याचिका फेटाळली. ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना संबोधत, ‘तुमच्यासारखे लोक देशाला शांतीने जगू देणार नाहीत’, अशी टीप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली. तसेच पाच लाखांचा दंडही कायम ठेवला आहे. वादविरहीत जमिनीवर पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्याला फटकारले.
याचिकाकर्ता पंडित अमरनाथ मिश्रा यांनी यापूर्वी ही याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल केली होती. यावर निर्णय सुनावताना अलाहाबाद कोर्टाने याचिका फोटाळली परंतु, त्यांना पाच लाखांचा दंडही ठोठावला होता. आज सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद न्यायालयाचा हाच निर्णय कायम ठेवत याचिकाकर्त्याचा पाच लाखांचा दंड हटवण्यालाही नकार दिला आहे.