लखनऊ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी प्रसंग वेळ पडली तर कायदा करावा अशी मागणी केली होती. मागील आठवडयात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी ही मागणी केली होती. दरम्यान विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामाची जोरात तयारी सुरु केली आहे. २९ ऑक्टोंबरपासून सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होणार आहे. कायदेशीर अडथळा दूर झाल्यानंतर तीन मजली भव्य राम मंदिर उभारण्याची योजना आहे. मंदिराच्या बांधकामासाठी ७० ट्रक भरुन दगड मागवले आहेत असा दावा अयोध्येथील विहिपकडून केला जात आहे.
रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याचा आपल्या बाजूने सकारात्मक निकाल लागेल अशी संघ परिवाराला आशा आहे. अयोध्येत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून रामजन्मभूमीकडे जाणारा रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद आहे.