मुंबई : ओल्या कचऱ्यापासून केवळ खतनिर्मितीचा प्रयोग आपल्याला माहीत असतो; मात्र हाच ओला कचरा विद्युतनिर्मितीसाठीही मदत करू शकतो हे गोरेगावच्या बांगूरनगर येथील अय्यप्पा मंदिरात सिद्ध करून दाखविले आहे. चार दिवसांपासून ओल्या कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात येत आहे. बायोगॅस आणि सौरऊर्जा या दोन्हींपासून या मंदिरातील बल्बसाठी लागणारी वीज तयार करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील ओला कचरा आणि या मंदिरामध्ये असलेल्या शुभकार्यासाठीचा हॉल इथे निर्माण होणारा कचरा यापासून हा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आला आहे. ५० ते १५० किलो ओल्या कचऱ्यापासून २०० वॅट्सच्या चार बल्बसाठी वीज पुरवण्यात आली आहे.
मंदिराच्या विश्वस्त समितीचे कर्नल (निवृत्त) चंद्रशेखर उन्नी यांनी हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याचे सांगत संपूर्ण मंदिरासाठी वीजनिर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. निर्माल्य आणि हॉलच्या कचऱ्यावर दोन वर्षांपासून बायोगॅस सुरू होता. मात्र त्याचा उपयोग केवळ पाणी तापवण्यासाठी व्हायचा. आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकत हरिश मिस्त्री यांनी अंगण बायोगॅस प्रकल्प या मंदिराच्या आवारात उभा केला. या हायब्रिड प्रकल्पाला मंदिरात यश मिळाले तर तो मुंबईत इतर ठिकाणी राबवता येईल आणि वीजेसाठी कोळशावरील अवलंबित्व कमी होईल, अशी आशा मिस्त्री यांनी व्यक्त केली.