पोलीस तपासात आले समोर
संतोष पाटील गोळीबार प्रकरणात 14 जानेवारीपर्यंत वाढीव कोठडी
जळगाव- माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावरील गोळीबार प्रकरणात अटकेतील पहिल्या क्रमांकाचा आरोपी अरबाज पिंजारी याने गोळीबाराच्या सुपारीपोटी 60 हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान पिंजारी याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सावखेडा शिवारात शेतात जात असताना 31 डिसेंबर रोजी आर्यन पार्कच्या मागच्या बाजूस पोहचल्यानंतर विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर रिव्हॉल्हरमधून गोळीबार केला. त्यात एक गोळी पाटील यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल असून अरबाजसह भुषण उर्फ जिगर बोंडारे, शेख समीर शेख कलीम यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. संतोष पाटील यांना मारण्याचा कट कोणत्या ठिकाणी केला. यावेळी कोण-कोण हजर होते, तसेच अरबाजने 60 हजार रुपये घेतले असून अजून कोणी-कोणास किती रुपये दिले याची चौकशीकरणेकामी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारपक्षातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार त्याला तीन दिवसांची वाढीव कोठडी सुनावण्यात आली आहे.