अरविंद डिसिल्वा कोहलीच्या प्रेमात

0

कोलंबो । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगातील अनेक माजी क्रिकेटपटूंना आपल्या खेळाने प्रभावित केले आहे. आता या यादीत श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू अरविंद डी. सिलिव्हा यांचा समावेश झाला आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्यावेळी मैदानावर प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अरविंद डी. सिलिव्हा यांनी विराटचे भरभरून कौतुक केले.

डिसील्वा म्हणाले की, विराटचा मैदानावरील खेळ पाहून मला वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण येते. विराट ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो त्याचा उद्दामपणा, आत्मविश्वास पाहून मला महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण येते. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाला कोहली ज्या प्रकारे सामोरा गेला ते कौतुकास्पद आहे. सुनील गावसकर, कपिल देव त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आता कोहली त्याच्या काळात भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास वाटतो.

श्रीलंकेला योजनाबद्ध कार्यक्रमाची गरज
कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या झालेल्या पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, श्रीलंकन क्रिकेटला योजनाबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांना तयार केले पाहिजे. प्रतिस्पर्धी संघाला भारी पडतील असे काही गोलंदाज आम्हाला घडवावे लागतील. श्रीलंकन संघाची सध्याची कामगिरी पाहून निराशा होते. पण आम्हाला यावर गांर्भीयाने विचार करुन श्रीलंकन क्रिकेटला योग्य दिशेने नेण्यासाठी योजना आखावी लागेल.आम्हाला दीर्घकालीन विचार करुन योजना बनवावी लागेल असे अरविंद डि सिलिव्ह म्हणाले. 1996 सालच्या श्रीलंकेच्या वर्ल्डकप विजयात डि सिलिव्हा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आक्रमक, शैलीदार फलंदाज म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. श्रीलंके विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने काल डावाने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.