नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. उद्या दुपारी त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहे. अरुण जेटली यांच्या निधनाने देशभरात राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण जेटली यांच्या रूपाने एक बहुमूल्य मित्र गमविला आहे. या मित्राला मी अनेक वर्षापासून ओळखत होतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली यातच मी धन्य मानतो. या दु:खात मी जेटली यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण जेटली यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. परिवारातील सदस्य गेल्यासारखे दु:ख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एक मार्गदर्शक गमविल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अरुण जेटली यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान कायमस्वरुपी लक्षात राहिल असे सोनिया गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.