नवी दिल्ली- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या पार्थिवावर दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते.
रविवारी दुपारी अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजपा मुख्यालयातून सुरूवात झाली. निगमबोध घाटावर तीन वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी सर्व संस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन जेटली यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांचं भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर यमुना तिरावरील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.