अरुण बोंगीरवार यांना जीवनगौरव पुरस्कार

0

जळगाव । दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण रविवारी, कांताई सभागृहात करण्यात आले. यावर्षीचा दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांना प्रदान करण्यात आला. तर दीपस्तंभ विवेकांनद पुरस्कार स्वागत थोरात यांना प्रदान करण्यात आला. याचसोबत स्वयंसेवी संस्थांना सर्वोतोपरी मदत मिळवून देणार्‍या नवीन व स्नेहल काळे (मुंबई), सुवर्णा बागल (गटविकास अधिकारी,कराड), व अभिजित जोंधळे (अंबेजोगाई) यांना तसेच मैत्र मांदियाळी संस्था (जालना), मारवाड विकास मंच (मारवाड, ता. अमळनेर) या संस्थांना दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील उपस्थित होते. यावेळी मंचावर लता बोंगीरवार, नीलकंठराव गायकवाड, डॉ. रेखा महाजन, संध्या सूर्यवंशी व यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. यावेळी शेतकरी, कष्टकरी सामान्य व्यक्तींच्या हस्ते श्री. अरुण बोंगीरवार यांना दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार तर प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वागत थोरात यांना दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मुख्य अतिथी डॉ. के. एच संचेती यांचा सत्कार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.

मनोबलच्या विद्यार्थ्यांनी जिंकली मने
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन दीपस्तंभच्या मनोबल प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रज्ञाचक्षु प्रा. राजेंद्र चव्हाण व यजुर्वेन्द्र महाजन यांनी तर आभार श्रुती बोरसे या विद्यार्थिनीने व्यक्त केले. कार्यक्रमात प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग विद्यार्थी तसेच कष्टकरी, शेतकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पीआय सुनील कुरहाडे, शरद जोशी, डॉ. भंडारी, अखिल तीलकपुरे, महेंद्र कोठारी, योगाची राष्ट्रीय खेळाडू शिवानी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तेजस या प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्याने ’आशाए’ हे गीत प्रस्तुत करून उपस्थितांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले. कार्यक्रमाची सांगता सम्राज्ञी लहानेच्या सुरेल पसायदानाने झाली. कार्यक्रमाला कांताई सभागृह अगदी तुडुंब भरून गेले होते. या अनोख्या सोहळ्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी दीपस्तंभ परिवाराच्या सर्व सहकार्‍यांनी सहकार्य केले.

समाजाचं ऋण फेडण्याची भावना जपा
आईच्या मातृत्वासारखी ऊर्जा देणारे कार्य हे दीपस्तंभच्या माध्यमातून होत आहे. लोकांचे कल्याण करणारे असाधारण व्यक्तिमत्व शोधून त्यांचा सन्मान दीपस्तंभने केला आहे. समाजाचं ऋण फेडण्याची भावना जपून ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आयुष्यात साधेपणा असावा. कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्याने लोकं मोठे होतात. ही भावना तुमच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची आहे. सोबतच देण्याची भावना जपणे देखील महत्वाची असून उपेक्षितांना न्याय देण्यासाठी देण्याची भावना महत्वाची आहे. ही भावना आपल्या मनाच्या शांततेसाठी देखील अत्यंत गुणकारक आहे. कर्मयोगी असल्याशिवाय तुमच्या गुणांना वाव मिळणार नाही. निस्पृह भावनेने कर्म केल्याने आपल्यासोबत सभोवतालच्या समाजाचा देखील विकास होतो असे संचेती यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुलांच्या मनावर संस्कार टाकल्यावर ते घडतात. सेवा आणि समर्पणाचं उदाहरणं म्हणजे दीपस्तंभचे कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

काम करत राहणे आवश्यक
चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक उपक्रमांचा नवा मार्ग निवडणारे नवीन काळे यांनी यावेळी निस्पृह भावनेने काम करत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. ’स्वयं’ च्या माध्यमातून देशात भन्नाट काम करणार्‍या व्यक्तींना सर्वांसमोर आणण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो असे काळे यांनी सांगितले. हा पुरस्कार आम्हाला आणखी बळ देणारा असून सामाजिक पर्यटनाची चळवळ भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.

आपण आयुष्यात केलेल्या चांगल्या कामाची ही पावती आहे. आयुष्यात असे काम करा की त्या कामामुळे दुसर्‍यांना आनंद मिळेल. सरकारी नोकरी ही समाजाची थेट सेवा करण्याचे सशक्त माध्यम असल्याचे बोंगिरवार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आयुष्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच अनुभवतोय. हा सन्मान आयुष्यभर हृदयाच्या कोपर्‍यात राहील.
– अरुण बोंगीरवार,(जीवनगौरव पुरस्कार प्राप्त)

अंधांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा फार चुकीचा असतो. अंध असण्याची जाणीव डोळस लोकांनी करून घेतल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. यामुळे उजेड करण्यासाठी अंधाराला जाळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी ’ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात यांनी
व्यक्त केले.
– स्वागत थोरात, (दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार प्राप्त)