अरूणाचलमध्ये भाजपची सत्ता स्थापन होण्याचे संकेत

0

इटानगर : अरूणाचल प्रदेशातील राजकारणाने आता निर्णायक वळण घेतले असून बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ‘पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचल’चे 32 तर एका अपक्ष आमदारासह भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे तेथे भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून आसाम पाठोपाठ ईशान्य भारतातील एका महत्वाच्या राज्यात भाजप आपला पाया मजबूत करणार असल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये सत्ता स्थापनेबाबत घडामोडी होण्याची शक्यता आहे.

भाजपला स्पष्ट बहुमत

‘पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचल’मधून पेमा खांडू यांना काढल्यानंतर त्यांच्यासमवेत एकूण 32 आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. एका अपक्ष उमेदवारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाकडे सध्या 11 आमदार आहेत. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ 44 झाले आहे. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 60 आहे. यामुळे तेथे आता भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले आहे. भारतीय जनता पक्षाचे महासचिव राम माधव यांनी ट्विट करुन अरुणाचलमध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याची घोषणा करत याला दुजोरा दिला आहे.

पेमा खांडूंची भूमिका निर्णायक

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा भारतीय जनता पक्षाकडे ओढा वाढत होता. यामुळे पीपीए अध्यक्ष काहफा बेंगिया हे त्यांच्यावर नाराज होते. जेम्बी टाशी, पासांग दोरजी सोना (मेचुका), चोव तेवा मेन (चोखाम), जिंगनू नामचोम (नामसाई) और कामलुंग मोसांग (मियाओ) यांना खांडूसोबत निलंबित करण्यात आले होते. आमदारांना पक्षविरोधी कृत्ये केली त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचेे स्पष्टीकरण बेंगिया यांनी दिले होते. मात्र खांडू यांनी थेट या पक्षालाच मोठे खिंडार पाडत भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.

दोन वर्षांची अस्थिरता संपणार?

अरूणाचल प्रदेशात गेल्या दोन वर्षापासून राजकीय अस्थिरता सुरु आहे. डिसेंबर 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या हेकेखोर कारभारामुळे नाराज झालेल्या कालिखो पूल यांनी बंडखोर आमदारांसह सत्ताबदल घडवण्याचा प्रयत्न केला. पूल यांच्या आत्महत्येनंतर पेमा खांडू यांनी अरुणाचलमध्ये सत्ता बदल घडवला होता. यानंतर पेमा खांडू यांच्यासह काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी पीपीएत प्रवेश केला होता. यानंतर अरुणाचलमध्ये पीपीएची सत्ता आली आणि पेमा खांडू मुख्यमंत्री झाले. पेमा खांडू यांनी भाजपला सत्तेत वाटा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षात नाराजी होती अशी चर्चा आहे. यातून खांडू यांना निलंबीत करण्यात आले होते. मात्र त्यांनी ‘पीपीए’लाच सुरूंग लावला. यामुळे आता तरी तेथे राजकीय स्थैर्य येईल का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.