कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदापुरात व्याख्यानमाला
इंदापूर : देशात नक्षलवाद नावाची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. महाराष्ट्र हा फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांचा देश असून या विचारांची दहशत मोदी सरकारला संपवायची आहे. परंतु भारतातील नागरीक हे सर्व सहन कसे करून घेतात? याचे मला आश्चर्य वाटते. देशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांना मोदी काडीचीही किंमत देत नाहीत. स्वातंत्र्यानंतर सर्वात अज्ञान अर्थमंत्री म्हणून कोण असेल तर ते अरूण जेटली असल्याचे मत अर्थतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले. कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पुण्यतीथीनिमित्त आयोजीत व्याख्यानमालेत ‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने, स्वरूप व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुकुंद शहा, पद्मा भोसले, भरत शहा, अॅड. कृष्णा यादव याप्रसंगी उपस्थित होते.
कॉंग्रेसची बघ्याची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटबंदी केली, त्यावेळीच काँग्रेसने मोदी सरकारला उलथून टाकायला पाहिजे होते. मात्र, त्यांनीही बघ्याची भुमिका घेतली. नोटबंदी करतेवेळी देशातील जनतेकडे 15 लाख 45 हजार कोटी चलनात असल्याचे मोदी सरकारचे मत होते. नोटबंदीचा आदेश काढल्यानंतर देशातीला काळा पैसा आपोआप चलनातून बाद होईल व बाहेर निघेल, असे मोदी सरकारचे मत होते. परंतु त्यातील 86 टक्के म्हणजे देशातील सर्वसामान्य जनतेकडे 13 लाख 58 हजार कोटी रुपये हे 500 व 1000 च्या रुपात होते. नोटबंदी करून सामान्य नागरीकांकडील 86 टक्के रक्कम बाद करणे एवढा मोठा बेजबाबदारपणाचा निर्णय जगातील कोणत्याही पंतप्रधानाने घेतला नसल्याचे प्रतिपादन डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
सहकार मोडीत काढणे अशक्य
दिल्लीहून केवळ भाऊंच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी इंदापूरात आलो आहे. आज महाराष्ट्रातील साखर कारखाने व सहकारी चळवळ मोडीत काढण्यासाठी काही मंडळी सरसावली आहेत. परंतु सहकार मोडीत काढणे यांना सहजासहजी शक्य होणार नाही. महाराष्ट्राला आज शंकररावजी पाटलांसारख्या सहकारात काम केलेल्या माणसांची पार्श्वभूमी आहे म्हणून आज महाराष्ट्रात सहकार हा बळकट झाला. प्रत्येक पहिली पिढी काम करते त्याच्या खांदयावर दुसरी पिढी वाढते. मात्र अशा पिढीचा विसर न पडता कायम स्मृती जपणारे हर्षवर्धन यांच्यातून माणसाचे दर्शन घडते, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.
मोदी सरकार अपयशी
मोदी सरकारची महाराष्ट्र व केंद्रात अपयशी सरकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शेतकर्यांचा प्रश्न फार चिघळत चाललेला आहे. त्याकडे सरकारने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. 2008 ते 2014 या काळात भारताच्या विकासाचा दर 8 टक्के होता. पण भाजपच्या राज्यात हाच दर 7 टक्केच्या खाली आहे. तर महागाई मात्र गगनाला भिडली आहे. विकास दराच्या बाबतीत या सरकारने कोणतेही भरीव काम केलेले नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब पराडे, डॉ. महादेव वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी केले व आभार उपप्राचार्य ढवळे सर यांनी मानले.