अरेरे… काय ही औलाद? ‘रेमंडस्’च्या सिंघानियांचे जेवणाचे वांदे!

0

मुंबई । उद्योगजगतातील एकेकाळचे सम्राट, भारतातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक, अब्जावधींच्या संपत्तीचे मालक आणि ’रेमंड्स’ची मालकी असलेल्या जेके (सिंघानिया) समूहाचे एकेकाळचे सर्वेसर्वा डॉ. विजयपथ सिंघानिया यांना आज वयाच्या 78 व्या वर्षी दोन वेळच्या जेवणाचेही वांदे झाले आहेत. गेली दोन दशके भारताच्या कार्पोरेट जगतात अनेक ’कम्प्लीट मॅन’ रुबाबात उभे करणार्‍या सिंघानिया यांच्या या दुर्दशेला दुसरं-तिसरं कुणी नाही तर पोटच्या पोराची औलाद, नातू गौतम हाच जबाबदार आहे. सिंघानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात शपथेवर सांगितलेय की, त्यांच्या नातवाने त्यांना एकेक पैशाला मोहताज केलेय. गौतम हा ’रेमंडस लिमिटेड’ला आपली खासगी जहागीर समजून कारभार करत असल्याचा आरोपही डॉ. सिंघानिया यांनी केला.

भाड्याच्या घरात राहण्याची वेळ
’रेमंड्स’चा कारभार सिंघानिया यांनी गौतमला सोपविल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ग्रांड पराडी सोसायटीत भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून मलबार हिल या पॉश इलाक्यातील ’जेके हाऊस’मधील स्वत:च्या मालकीच्या ड्युप्लेक्स घराचा ताबा मिळावा, अशी मागणी केली आहे. सध्या डॉ. सिंघानिया पैशांअभावी किती हलाख्यात जीवन जगत आहेत, याचे प्रतिज्ञापत्र त्यांच्या वकिलाने बुधवारी सादर केले.

प्रॉपर्टीचा वाद
ज्या ड्युप्लेक्स घराच्या ताब्यासाठी याचिका दाखल केली गेली ते ’जेके हाऊस’ 1960 मध्ये बांधले गेले होते. त्यावेळी ही 14 माजली इमारत होती. त्यानंतर या इमारतीतील 4 ड्युप्लेक्स ’रेमंड्स’ची सहयोगी फर्म ’पश्मीना होल्डिंग्स’ला देण्यात आले. 2007 मध्ये कंपनीने या इमारतीचे पुनर्निर्माण करण्याची योजना आखली. त्या करारानुसार, डॉ. सिंघानिया, नातू गौतम, भाऊ अजयपथ यांची विधवा पत्नी वीणादेवी आणि त्यांची मुले अनंत, अक्षयपथ यांना प्रत्येकी 5,185 स्क्वेअर फुटाचा एक-एक ड्युप्लेक्स देण्यात येणार होता. त्यासाठी त्यांना 9,000 रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने किंमत अदा करायची होती.

संपत्ती मिळताच वार्‍यावर सोडले
’जेके हाऊस’ इमारतीतील आपल्या वाट्यासाठी वीणादेवी व त्यांचा मुलगा अनंत यांनी आधीच संयुक्त याचिका दाखल केली आहे. याशिवाय, अक्षयपथने स्वतंत्र याचिका दाखल केली. विजयपथ सिंघानिया यांचे वकील दिनयर मेडन यांनी न्यायालयात सांगितले की, सिंघानिया यांनी यापूर्वीच आपली सारी संपत्ती नातवाच्या नावे केली. मात्र, तो आता त्यांच्याकडे लक्ष देत नाही. विजयपथ यांनी आपल्या नावाचे सर्व, 1000 कोटींचे शेअर्स गौतमला दिले. ही संपत्ती मिळताच गौतमने जन्मदात्याच्या बापाला वार्‍यावर सोडले. त्याने आजोबाची कार व चालकही काढून घेतला. भाड्याच्या घराचे भाडेही तो आता अदा करत नाही.

काय केली न्यायालयाला विनंती?
डॉ. विजयपथ सिंघानिया यांनी न्यायालयात विनंती केली, की त्यांना ’जेके हाऊस’मध्ये 27, 28 व्या मजल्यावरील ड्युप्लेक्स मिळावा. महिन्याला 7 लाख रुपये खर्च मिळावा. ’रेमंडस्’च्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, कंपनीच्या शेअर्सधारकांनी जूनमधील वार्षिक सर्वासाधारण बैठकीत डॉ. सिंघानिया यांना नव्या इमारतीत ड्युप्लेक्स सदनिका देण्याचा तसेच मासिक 7 लाख रुपये देण्याचा ठराव फेटाळून लावला आहे.

संपत्तीसाठी याचिकाच याचिका
डॉ. विजयपथ यांचा दुर्लक्षित मोठा मुलगा मधुपती आणि सून अनुराधा हेही मागे नाहीत. अनन्या, रसालिका, तारिणी आणि रैवत या त्यांच्या चारही मुलांनी 1998 च्या कौटुंबीक समजुतीनुसार, आपल्यालाही संपत्तीत वाटा मिळावा, अशा याचिका दाखल केल्या आहेत.

न्यायालय म्हटले, आपापसात मिटवा
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी भारतातील प्रतिष्ठीत उद्योगसमूहाच्या संस्थापक-मालकाच्या कौटुंबीक वादातून दुर्दशेची अशी याचिका न्यायालयात येणे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले. हा वाद आपापसात मिटवल्यास उत्तम, असा सल्ला त्यांनी वादी-प्रतिवादींना दिला. न्यायालयाने ’रेमंड्स’च्या वकिलांना 18 ऑगस्टपर्यंत भूमिका कळवायला सांगितली. प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्टरोजी होईल.

काय आहे जेके ग्रुप?
लाला जुग्गीलाल आणि स्वर्गीय लाला कमलपत सिंघानिया या बाप-बेट्यांनी 1918 मध्ये ’जेके उद्योग’ सुरु केला. जुग्गीलाल आणि कमलपत दोघांच्या नावातील इंग्रजी आद्याक्षरे म्हणजेच ’जेके’. टेक्स्टाईल, कापड उद्योग याबरोबरच आता हा समूह एफएमसीजी ग्राहकोपयोगी उत्पादने, केमिकल्स, इंजिनिअरिंग, आरोग्यसेवा, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. ’रेमंड्स’ हा कंपनीचा आजही अव्वल ब्रांड मानला जातो.