रावेत :वाल्हेकरवाडी परिसराचा विकास झपाट्याने झाला असा दावा प्रशासन आहे. मात्र, या भागात काही प्रमाणातच नागरी सुविधा पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. तरीही इतर उपनगराच्या तुलनेत वाल्हेकरवाडी हा भाग म्हणावा तेवढा विकसित झालेला नाही. मागील काही वर्षापासून वाल्हेकरवाडी चौकात प्रवाशासाठी साधा बस थांबा तयार करण्यात आलेला नाही. या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्यामुळे पावसाळा,हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूत प्रवाशांना रस्त्यावरच थांबावे लागते. यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवासी निवारा शेडविनाच
वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात मुख्य बस थांबा आहे. येथून शहरात जाण्यासाठी ‘पीएमपीएल’च्या बसेस मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमाने, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक येथे थांबलेले असतात मागील अनेक वर्षापासून येथे निवारा शेड उभारण्यात आलेच नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा रस्त्यावर ताटकळत उभे राहूनच करावी लागत आहे. हा मुख्य रस्ता द्वितगती मार्गाला जोडल्यामुळे आणि मुख्य चौक असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. तरीही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरासह आजूबाजूच्या उपनगरात अनावश्यक अशा ठिकाणी सुद्धा काही महिन्यांपूर्वी नवीन आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आले आहे. परंतु या मुख्य चौकात अनेक वर्षांपासून निवारा शेड नाही. याकडे पालिका प्रशासनाच्या संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष जात नाही कि जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी शंका येथील प्रवासी व नागरिक व्यक्त करीत आहेत.
लाजीरवाणी बाब
अगदी काही अंतरावर असणार्या किवळे-औंध या बीआरटी मार्गावरील बस थांब्यावर एकाच ठिकाणी दोन अत्याधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड लाखो रुपये खर्च करून उभे करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणच्या बस थांबा शेडवर प्रवासी क्वचित केव्हा तरी दिसतो. मात्र रोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असणार्या वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकात प्रवासी निवारा शेड नसावे हि लाजिरवाणी गोष्ट आहे. उन्हाळा, पावसाळा,हिवाळा या तिन्ही ऋतूत विविध झळा वाल्हेकर वाडीकर सोसत असताना येथील मुख्य शिवाजी चौकातील बसस्टॉपवर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. डोक्यावर छप्पर नसल्याने नेमके थांबावे कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
प्रशासन, नगरसेवकांचे दुर्लक्ष
महापालिका, पीएमपीएल प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यापैकी कोणीही त्याकडे लक्ष देत नसल्याने बसस्टॉपची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. या बसस्टॉपवरून सकाळी किमान तीनशे ते चारशे प्रवाशांची ये-जा होत असते. या बसथांब्याच्या परिसरातील लक्ष्मीनगर, गावठाण,भोंडवे नगर या परिसरातील प्रवासी या बसस्टॉपचा वापर करतात. तर शहरातील व पुण्यातील मोठया कार्यालयात काम करणारे कर्मचारी, आणि इंडस्ट्रीजचे कर्मचारी या बसस्टॉपचा वापर करतात. चिंचवड गावातील शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी व येण्यासाठी विद्यार्थी देखील या बसस्टॉपचा वापर करतात. मात्र या बसस्टॉपला शेड बांधण्यात न आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय, पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.