डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचा पूर्वज माकड! त्याच्या पुढची स्थिती म्हणजे आदिमानव! हा जंगलात राहणारा, कंदमुळे खाणारा, प्राण्यांची शिकार करून खाणारा. हे त्याचं रूप. माकडाचा माणूस होताना उत्क्रांतीवादाच्या तत्त्वाप्रमाणे निरुपयोगी असलेली इंद्रिये गळून पडली. जंगलात राहणार्या थंडी-वार्यापासून रक्षण व्हावे म्हणून नियतीने त्याला भरपूर केस दिले. जलद धावता यावं म्हणून हे चार पाय. फटकारण्यासाठी शेपूट दिले असावे. आता माकडाच्या अंगावरचे केस गळून पडले. शेपूट गळून पडले. माकडेही दोन पायांवर चालू लागली आणि दुसर्या दोन पायांचा उपयोग काम करण्यासाठी हात म्हणून करू लागली. मग नियतीने त्याला विचारशक्ती दिली आणि आजचा माणूस स्वतःला माकड म्हणवून न घेता माणूस म्हणवून घेऊ लागला. पण खरं तर माकडाचा माणूस झालाच नाही. माकडाला जसं प्राणी म्हणून ओळखलं जातं तसं माणसालाही मनुष्यप्राणी म्हणूनच ओळखले जाते. प्राण्यांचे गुण उत्क्रांतीनंतरही माणसामध्ये तसेच राहिलेत. सगळ्या सजीवांमध्ये माणसाला विचार करायची ताकद नियतीने सर्वांत जास्त दिली खरी, पण ती कशी वापरायची हे ज्ञान मात्र त्याला झालेच नाही आणि म्हणूनच आता ‘अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस’, हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. माकड-उड्या तर माणूस सततच मारत असतो. माकड-उड्या मारणारे कोण? लहान मुलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. लहान मुलं मारतात त्या बेडूक उड्या आणि मोठी माणसं मारतात त्या माकड-उड्या. आपले नेते नाही का या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत! एका पक्षातून दुसर्या पक्षात ते कधी जातात ते कळतंच नाही. माकडे कशी एका झाडावरून पटकन् दुसर्या झाडावर कधी उडी मारतात ते कळतही नाही तसेच काही काही जाहिरातींत नाही का आपले नटनट्या छोट्या-छोट्या चड्ड्या घालून वेड्या-वाकड्या उड्या मारतात, तेव्हा तर बाबा आपल्या पूर्वजांची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. माकडाचा माणूस होताना उपयोग नसलेली इंद्रिये गळून पडली. नाहीशी झाली. आज आपल्याला दिसतात ती माणसाची सुधारित इंद्रिये, सुधारित मेंदू. मग प्रश्न असा पडतो की, या सुधारित मेंदूचा उपयोग, सुधारित इंद्रियांचा उपयोग माणूस खरंच चांगल्या कामासाठी करतोय का? मग भीती अशी वाटते की जर हे असंच होत राहिलं तर मग आपले निरुपयोगी अवयव, आपला निरुपयोगी मेंदू नाहीसा तर नाही ना होणार? आणि आपण पुन्हा आपल्या मूळ पदावर तर जाणार नाही ना! विचारशक्ती कशी वापरायची हे ज्ञानच माणसाला मिळालेलं नाही. अजूनही तो जंगलातल्या पशूसारखाच अविचाराने वागतो आहे.
आज अत्याचाराच्या, बलात्काराच्या, खुनाच्या इतक्या असंख्य घटना घडताहेत. ही कृत्ये करणारी माणसं विचारशक्तीचा उपयोग करताना दिसतात का कुठे? कसलाही विचार न करता माणसं एकमेकांवर प्राणघातक हल्ले करतात. दिवसा-ढवळ्या, भरवस्तीत, चालत्या बसमध्ये स्त्रियांवर बलात्कार केला जातोय. भररस्त्यांवर एकमेकांचे खून पाडले जाताहेत, लोकांना दिसतंय, पण कोणीच काही करू शकत नाही. विज्ञानाला हाताशी धरून नवनवीन शोध लावतोय पण त्याचा उपयोग त्याला जगाच्या भल्यासाठी करता येत नाही. धातू शास्त्राचा शोध लागला. त्यामुळे शेतीची नवीन अवजारे बनवता आली. या शोधाचा उपयोग शेतीसाठी करता करता त्यानं तलवारी, सुरे, बंदुका बनवायला सुरुवात केली आणि त्याचा उपयोग दुसर्याचे प्राण घेण्यासाठी करू लागला. बोटीचा शोध लागला. त्या बोटीचाच उपयोग माणूस दुसर्यावर हल्ले करण्यासाठी करू लागला. फार मोठे शास्त्रज्ञ सर थॉमस यांनी अणूचा शोध लावला. याचा उपयोग कोणत्याही संहारासाठी करायचा नाही असे त्यांनी म्हटलं होतं. पण आजचा माणूस या शोधाचा वापर करून सगळं जगच उद्ध्वस्त करायला निघालाय. म्हणजे प्रगतीची, विज्ञानाची वाट समोर दिसत असूनसुद्धा माणसाची पावले मात्र विनाशाकडे वळताहेत. म्हणूनच भीती वाटतेय की मनुष्य पुन्हा आपल्या मूळपदावर तर परत जात नाहीये ना?
-किरण चौधरी
9823312005