अमळनेर। येथील महसूल विभागाच्या सेतू सुविधा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्रांवर अधिकार्यांच्या स्वाक्षर्यांसाठी विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र, तहसील कार्यालयातून दिल्या जाणार्या दाखल्यांवर आता डिजिटल स्वाक्षरी होणार असल्याने विविध दाखले वेळेवर मिळणार आहे. अर्ज केल्यानंतर 24 तासात दाखल्यांचे वितरण होणार असून अर्जदारांचा वेळ वाचणार आहे. मंगळवारी 4 रोजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते दाखल्याचे वितरण करुन शुभारंभ करण्यात आला. तहसील कार्यालयातून राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्रांसह उत्पन्नाचा दाखला मिळतो.
प्रशासकीय कामांमुळे वेळप्रसंगी तहसीलदार कार्यालयात अनुपस्थित असल्यास दाखल्यांवर स्वाक्षरीचे काम रखडत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागत असे. तहसीलदार महत्वाच्या कामानिमित्त काही दिवस बाहेर असल्यास दाखले स्वाक्षरी अभावी पडून राहत असे. अमळनेर तहसील कार्यालयात या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. डिजिटल स्वाक्षरी दाखला वितरण करतांना आमदार शिरीषदादा चौधरी, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार आर.आर.ढोले, उदय पाटील, नरेंद्र चौधरी, किरण गोसावी, राजेंद्र पाटील, राजीव पाटील, सुनील भामरे, सुरेंद्र पाटील, पंकज चौधरी, किशोर पाटील, समाधान पाटील, प्रवीण पाटील, उमेश पाटील, दिनेश चौधरी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार बाहेरगावी असल्यास लॅपटॉपवर दाखल्यांची तपासणी करुन मंजूर केलेल्या दाखल्यांवर डीजीटल स्वाक्षरी करतील. त्यानंतर सेतूमधून दाखल्यांची प्रत मिळणार आहे.