नागोठणे । उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह आपला अर्ज रोहे तहसील कार्यालयात नेमलेल्या निवडणूक अधिकार्याकडे भरावयाचा आहे. सरपंचपद तसेच इतर प्रभागांत असणार्या राखीव जागेसाठी अर्ज भरताना त्यासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य राहाणार असल्याचे रोहे तहसीलदार सुरेश काशीद यांनी स्पष्ट केले. येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 25 फेब्रुवारीला होत आहे व सोमवार 5 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करणेसंदर्भातील सभा येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात पार पडली, त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात तहसीलदार काशीद बोलत होते.
आचारसंहितेचे पालन होण्यासाठी पथक
या सभेला पो. नि. पांडुरंग गोफणे, सरपंच प्रणय डोके, महसूल खात्याचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, ग्रामविकास अधिकारी योगेश गायकवाड आदींसह प्रकाश मोरे, मंगेश कामथे, चंद्रकांत गायकवाड, भोईर गुरुजी, असगर मुल्ला तसेच महसूल खात्याचे कर्मचारी आणि सर्वपक्षीय नागरिक उपस्थित होते. निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात काशीद यांनी उपस्थितांसमोर ठळक मुद्दे स्पष्ट केले. मतदारावर प्रभाव पाडणारे कोणतेही कार्य करू नये. नागोठणे सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा पर्यायाने आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात पथक तयार केले जाणार असून आचारसंहितेचा भंग झाल्यास आल्यास संबंधित अधिकारी गुन्हा नोंदवणार आहेत.
मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार नाही
जाहीर प्रचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया अर्थात एसएमएस आणि व्हॉट्सअॅपवरील प्रचार मतदानाच्या 48 तास बंद करणे अनिवार्य राहील. आचारसंहितेचा भंग केल्याबाबतची तक्रार नेमलेला निवडणूक अधिकारी किंवा रोहे तहसील कार्यालयात करावी व त्याबाबत संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल असे तहसीलदार काशीद यांनी बैठकीत स्पष्ट केले, तर पोलीस निरीक्षक गोफणे यांनी मतदानाची तारीख 25 फेब्रुवारी आहे व त्या दिवशी रविवार असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार नागोठणे शिवाजी चौकालगत भरणारा आठवडा बाजार त्या दिवशी भरणार नाही.