सत्ताधार्यांना दिला घरचा आहेर; पत्राची जोरदार चर्चा
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अगदी महामार्गलगत असलेल्या बांधकामांकडेही प्रशासन कानाडोळा करीत आहे. त्यामुळे अशा बांधकामांना अर्थपूर्ण संबंधातून अभय दिले जात असून, यात प्रचंड घोटाळा असल्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची सत्ता असताना भाजपच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे यांनीच हा आरोप करून सत्ताधार्यांना घरचा आहेर दिला आहे.
रेडझोनमुळे बांधकामावर मर्यादा
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बहुतांश भागात रेडझोनमुळे बांधकामांवर मर्यादा आल्या आहेत. बोर्डाकडून सर्व कागदपत्रांची शहानिशा करूनच बांधकाम परवानगी दिली जाते. मात्र, बाधित क्षेत्रात कटाक्षाने बांधकाम परवानगी नाकारली जाते. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. सर्व प्रकार माहिती असूनही अशा बांधकामांवर कारवाई केली जात नसल्यामुळे या प्रकारांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा धडधडीत आरोप सूर्यकांत सुर्वे यांनी केला आहे. या विषयासंदर्भात त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र दिले असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर निशाणा
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सूर्यकांत सुर्वे यांनी थेट निशाणा साधला आहे. सुर्वे यांच्या पत्रानुसार, पुणे-मुंबई महामार्गावर दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम कुठल्याही परवानगी शिवाय सुरू आहे. हा प्रकार माहिती असूनही या कामाकडे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत. या प्रकरणात नेमके काय गूढ आहे, याची केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे सुर्वे यांच्यावतीने करण्यात आली आहे.
कारभारावर प्रश्नचिन्ह
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ते आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत आहेत. त्यांच्या या कारभारामुळे भाजप सरकारची सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत आहे, असाही आरोप सूर्यकांत सुर्वे यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे एकूणच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची सत्ता असताना सुर्वे यांनी घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.