‘भाजप’मय असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील स्थिती
पिंपरी-चिंचवड : राज्याचे अर्थमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात होते. मात्र, त्यांच्या मागे ना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा, ना स्वागतासाठी महापालिकेच्या अधिकार्यांची फौज! त्यामुळे आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाला येवूनही त्यांना कोमेजला चेहर्याने माघारी जावे लागले. शहरात भाजपचे एक राज्यसभा खासदार, दोन आमदार, दोन महामंडळांचे अध्यक्ष आणि तब्बल 80 नगरसेवक असूनही एकही जण त्यांच्याकडे फिरकला नाही. अशा या विचित्र पद्धतीचे स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
राजशिष्टाचाराचे संकेत बासनात
हे देखील वाचा
पिंपरी येथील एच. ए मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय फुलांचे तीन दिवसीय आयोजित प्रदर्शन गुरूवारपासून सुरू झाले. याच्या उद्घाटनासाठी मुनगंटीवार आले होते. कार्यक्रम खासगी असला तरी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री शहरात असल्यास राज शिष्टाचारानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, अधिकार्यांनी त्यांचे स्वागत करण्याचे संकेत आहेत. त्याचे पालन केले जाते. आज मात्र अर्थमंत्री असूनही ना पदाधिकार्यांनी, ना अधिकार्यांनी स्वागत केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील हे तर मंत्र्यांच्या दौर्याबाबत अनभिज्ञ होते. त्यांना याची कल्पना देण्याची तसदी देखील कोणी घेतली नाही.
खासदार, आमदार गेले कोठे?
तसेच मुनगंटीवर पक्षाचे ‘हेवीवेट’ नेते असूनही यांच्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा नव्हता. निमित्त ठरले स्पेन दौर्यावर गेलेल्या काही पदाधिकार्यांचे! परंतु, उपमहापौर, खासदार, आमदार, स्थायी समिती सभापती, 80 पैकी एकही नगरसेवक किंवा पक्षाचे पदाधिकारी शहरात असूनही त्यांच्याकडे फिरकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून मुनगंटीवर ओळखले जातात. त्यांच्याकडे राज्याच्या आर्थिक नाड्या आहेत. तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले होते. ते पक्षाचे महत्वाचे नेते असतानाही शहरात येऊनही त्यांच्याकडे कोणीच फिरकले नाही. पिंपरी महापालिकेत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. शहरात एका राज्यसभा खासदार, दोन आमदार, दोन महत्वाची महामंडळे आहेत. तर, पक्षाचे 80 नगरसेवक आहेत. यापैकी एकही जणही अर्थमंत्री मुनगंटीवर यांच्याकडे फिरकला नाही. तसेच पालिकेच्या अधिका-यांनी देखील त्यांचे स्वागत केले नाही. त्यामुळे भाजपचा हाच का? शिष्टाचार असा सवाल उपस्थित केला जात आहे.