अर्थव्यवस्था परीवर्तनासाठी भारतीय व्यवसायांतील संघर्ष कमी करण्याची गरज

0

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी येथील स्थानिक व्यवसायांमधील संघर्ष कमी करून सरकारने उद्योजकांसोबत विश्‍वासपूर्ण वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, जास्तीत जास्त तरुण उद्योगविश्‍वात आल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक व माजी अध्यक्ष एन.आर. नारायण मूर्ती यांनी केले. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया येथील डार्डन स्कूल ऑफ बिझनेस येथे थॉमस जेफरसन फाउंडेशनने मूर्ती यांना पुरस्कार देऊन गौरविले. या वेळी ते बोलत होते.

आजचे उद्योजक पूर्वीपेक्षा खूप चतूर
व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याचे धाडस भारतीय तरुणांनी करायला हवे. जगभरातील तरुणांनी असे केल्यास जागतिक अर्थव्यवस्था वेगळ्या वळणावर जाऊन तिचा विकास होईल. त्यामुळे जागतिक स्पर्धा होईल; पण ती सौहार्दपूर्ण असेल. भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी एकत्रित विचार करण्याची गरज असल्याचेही श्री. मूर्ती म्हणाले. सध्याच्या युगात उद्योजकांपुढील आव्हाने तुलनेने कमी असून, आम्ही जेव्हा इन्फोसिस सुरू केली होती, त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती, असे सांगत त्या काळात भांडवली साधने मिळवणे खूप जिकिरीचे असायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. अनेक बँका, सहकारी वित्तसंस्था नवउद्योजकांसाठी आपली दारे खुली ठेवतात. आजचे उद्योजक पूर्वीपेक्षा खूप चतूर आहेत. जागतिक पटलावर स्पर्धेचे वातावरण असल्यामुळे ते साहजिकच आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायला जाता, त्याच्या आधीच कुणीतरी ती केलेली असते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सजग राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योजकांनी चपळ, चतूर, जागतिक आणि स्पर्धात्मक राहायला हवे.

इन्फोसिस गुंतवणुकदारांना लाभांश देणार
बंगळुरू । मार्चला संपलेल्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी राहिलेल्या इन्फोसिसने समभागांची फेरखरेदी (बायबॅक) आणि वाढीव लाभांश या माध्यमातून भागधारकांना 13 हजार कोटी रुपये देण्याची योजना तयार केली आहे. पडून असलेल्या मुक्त निधीतून हा खर्च कंपनी भागविणार आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्याच पातळीवर राहिला. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ही कामगिरी खूपच कमजोर आहे. त्यामुळे कंपनीचे संस्थापक, माजी कार्यकारी आणि गुंतवणूकदार यांच्याकडून कंपनीवर पडून असलेल्या रोख निधीचा योग्य वापर करण्यासाठी दबाव होता. त्यामुळे कंपनीने समभाग फेरखरेदी व लाभांश वाढविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कंपनीने स्वतंत्र संचालक रवी वेंकटेसन यांची सहायक चेअरमनपदी नेमणूक केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत संचालक मंडळात मतभेद झाले. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाचा विस्तार करण्यात आला.