मथुरा : वृंदावन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या सहयोगी संघटनांच्या समन्वय बैठकीत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खास करून नोकर्या व रोजगारनिर्मितीत मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, आर्थिक आघाडीवरही हे सरकार अपयशी ठरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत यावेळी शहा यांनी सरसंघचालकांशी चर्चा करून त्यांना फेरबदल कळविला, अशी माहिती संघसूत्राने दिली.
काश्मीर-चीनच्या कूटनीतीबद्दल शाबासकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काश्मीर व चीनप्रश्नी चांगले काम केले. खास करून सरकारने केलेल्या कूटनीतीला आलेले यश पाहाता, संघाने मोदी सरकारला शाबासकी दिली. केंद्राचे परराष्ट्र व्यवहार धोरण योग्य वळणावर असून, त्याबाबत संघ समाधानी असल्याचे सांगण्यात आले. तथापि, काही मंत्रालयाच्या कामकाजावर संघनेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर संघप्रमुखांनी आपली नाराजी दर्शवून सरकारला कामकाजात बदल करण्याचे अपरोक्षरित्या सूचविले. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात या नाराजीचे प्रतिबिंब दिसून येईल, असेही सूत्र म्हणाले.
शहा-मोदी यांच्यात चर्चा
या बैठकीनंतर अमित शहा दिल्लीला निघून आले. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल व संभाव्य नावांबाबत शहा यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याचे संघसूत्र म्हणाले. संघाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर रविवारी मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असून, सकाळी 11 वाजताचा मुहूर्त निघाला आहे. संघप्रमुखांच्या निरोपाबाबत अमित शहा यांनी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत संघाला अपेक्षित असलेली केंद्र सरकारची नीती आणि पुढील निर्णय याबाबतही मोदी यांना सूचविण्यात आल्याचे संघसूत्र म्हणाले.