अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत!

0

देशाची ठोक महागाई दर दुप्पटीने वाढला

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात पेट्रोलचे दर सात रुपयांपेक्षा अधिक दराने वाढले असून, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गत तीन वर्षात उत्पादन शुल्क 126 टक्क्यांनी वाढविल्यानेच इंधनाचे दर भडकल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दिली आहे. सद्या पेट्रोलचे मूळ दर हे 31 रुपये प्रतिलीटर असून, वाहनधारकांना मात्र ते 79 रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करावे लागत आहे. मोदी सरकारने 16 जूनपासून इंधनदराबाबतची समीक्षानीती लागू केली होती. त्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत गेली आहे. दुसरीकडे, देशाच्या ठोक महागाईदरातही ऑगस्ट महिन्यात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जुलैत ठोक महागाईदर 1.88 टक्के इतका होता. तो आता 3.24 टक्क्यांवर गेला आहे. अन्नधान्य महागाईदरही उसळला असून, 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. कांदे 88.46 टक्के, आलू 73.82 टक्के, आणि भाजीपाल्याच्या दरात 44.91 टक्क्याने दरवाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट संकेत प्राप्त झालेले आहेत.

तेलावर अतिरिक्त शुल्क
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात दररोज लागणार्‍या फळे व भाजीपाल्याच्या दरात 5.29 व 3.16 टक्क्याने दरवाढ झालेली आहे. इंधन तसेच विजेच्या किमतीतही 9.99 टक्क्यांनी दरवाढ झालेली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठोक महागाई दर झपाट्याने वाढत चालला असून, ही दरवाढ सुदृढ अर्थव्यवस्थेचे संकेत मानले जात नाहीत. मांस, मासे, तेल आणि इतर खाद्यान्नांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या समीक्षानीती धोरणाला फाटा देण्यामुळे इंधनाचे दर भडकलेले आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल व डिझेलचे दर भडकलेले असल्याने ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. मोदी सरकारने तेलावर अतिरिक्त कर लावल्यामुळेच ही दरवाढ झाली आहे. या शिवाय, उत्पादन शुल्क दरवाढ तर 126 टक्क्यांनी वाढलेली आहे.