भुसावळ। अर्थशास्त्र हा विषय महत्वपूर्ण असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कौशल्य विकास व स्वयंरोजगार यावर अभ्यासक्रमात भर देण्यात यावा. या विषयापासून कुणाचीही सुटका नसल्यामुळे यासाठी समाजाला विषयाच्या माध्यमातून अर्थशास्त्रप्रेमी तयार करुन देेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करण्यावर भर देण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. एम.व्ही. वायकोळे यांनी केले. येथील नाहाटा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदेशान्वये प्रथम वर्ष कला, अर्थशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्या वायकोळे बोलत होत्या.
या विषयावर करण्यात आली चर्चा
कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. एस.के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एन.ई. भंगाळे, डॉ. ए.डी. गोस्वामी, प्रा. व्ही.डी. पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील प्रथम वर्ष कला, अर्थशास्त्र विषय शिकविणार्या 50 तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा दोन सत्रात संपन्न झाली. पहिल्या सत्रात प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स ऑफ महाराष्ट्र या विषयावर चर्चा झाली.
चर्चासत्रात यांनी घेतला सहभाग
यावेळी प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याची पात्रता, स्पर्धा परिक्षा, नेट सेट परिक्षा विचारात घेवून अभ्यासक्रम तयार करण्याचे ठरले. दुपारच्या सत्रात गृह अर्थशास्त्र या विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. मनोज गायकवाड, प्रा.डॉ. शरद अग्रवाल, प्रा. अरविंद भंडारे, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. के.के. वाघ, डॉ. सुमित्रा पवार, प्रा. ए.एन. चित्ते यांनी सहभाग घेतला.
अंतिम मसुदा तयार
प्रा. व्ही.डी. पाटील यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमावर चर्चा करुन अंतिम मसुदा तयार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.डॉ. ए.डी. गोस्वामी यांनी तर प्रास्ताविक प्रा. व्ही.डी. पाटील व आभार प्रदर्शन प्रा. एस.टी. धुम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. जे.पी. आडोकर, प्रा. व्ही.ए. सोळुंके, प्रा. समाधान पाटील, प्रा. नयना पाटील, डॉ. रुपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी प्राध्यापकांमधून प्रा. के.के. वाघ, प्रा. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा.डॉ. ए.जी. सोनवणे यांनी कार्यशाळेचा लेखाजोखा मांडला.