अर्थसंकल्पाची आकडेवारी चुकीची : डॉ. मनमोहन सिंग

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधील वित्तीय आकडेवारी चुकीची असल्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक डोळ्यांपुढे ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असे मी म्हणू शकेन, असे मला वाटत नाही.

मात्र या अर्थसंकल्पामधील वित्तीय आकडेवारी चुकीची असू शकते, असे सिंग म्हणाले. त्यांनी वित्तीय तुटीवर चिंता व्यक्त केली असून, ही तूट भरून कशी काढणार, असा सवालही उपस्थित केला. जेटली यांनी स्वामिनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव देण्याची घोषणा केली. मात्र, हे कशाप्रकारे साध्य होणार, अशी विचारणा सिंग यांनी केली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही वित्तीय समतोल साधण्याच्या परीक्षेत अर्थमंत्री अरुण जेटली नापास ठरल्याची प्रतिक्रिया दिली. वित्तीय तुटीबाबत जो अंदाज जेटली यांनी व्यक्त केला आहे तो चिंताजनक आहे, असे म्हणाले.