अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा होणार्या महसुलात तूट
पुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा होणारा महसूल यात मोठी तूट असल्याचे समोर आले आहे. अर्थसंकल्पात दर्शविण्यात आलेले वाढीव उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न पाहिले, तर महापालिकेचा अर्थसंकल्प कागदोपत्रीच कोटींची उड्डाणे करीत असल्याचे स्पष्ट होते.
महापालिका प्रशासनाने 2019-20 चा 6 हजार 85 कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प स्थायी समितीला नुकताच सादर केला. चालू वर्षात महापालिकेला 5 हजार 800 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. डिसेंबरअखेरपर्यंत 3 हजार 54 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. मार्चअखेरपर्यंत 4 हजार 300 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा अंदाज खुद्द प्रशासनाचा आहे. असे असताना प्रशासनाने उत्पन्नाचे आकडे फुगवून अर्थसंकल्प सादर केला. त्यातूनच महापालिकेच्या अर्थसंकल्पाने सहा हजार कोटींचा टप्पा पार केल्याची थाप प्रशासनाने आपल्याच पाठीवर मारून घेतली.
तूट दरवर्षी वाढतेय
प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत मंजूर अर्थसंकल्प आणि प्रत्यक्षात जमा झालेला महसूल यांची माहिती घेतल्यानंतर दरवर्षी त्यातील तूट वाढतच असल्याचे समोर आले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने सहाजिकच शहराच्या विकासावर होणार्या खर्चदेखील कमी झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शहर वाढत असताना महापालिकेचे उत्पन्न वाढणे अपेक्षित आहे. उत्पन्नवाढीसाठीच्या ठोस उपयोजना आणि त्यांची कडक अंमलबजावणी झाली, तर हे शक्य होईल. परंतु केवळ कागदोपत्री आकडे वाढून दाखविण्याचे काम प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष करीत आहेत. या प्रार्श्वभूमीवर स्थायी समिती तरी वास्तववादी अर्थसंकल्प सादर करणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
करवाढीची शक्यता कमी
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी आणि मिळकत करात वाढ अपेक्षित धरली आहे. त्यातून उत्पन्नात 250 ते 300 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरली आहे. ही वाढ धरून 6 हजार 85 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहेत. या वर्षात लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यामुळे या करवाढीला सत्ताधारी पक्षाकडून मान्यता मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील अपेक्षित धरलेल्या उत्पन्नाला महापालिका स्तरावरच खो बसणार आहे.