अर्थसंकल्पाचे रटाळ प्रस्तुतीकरण, विरोधक चिडीचूप!

0

शांततेच्या वातावरणात सादर केला अर्थसंकल्प

मुंबई (निलेश झालटे) :- सरकारच्या वतीने शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र गेल्यावर्षी विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ सुरु असतानाही ज्या ताकतीने त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता तो उत्साह यावेळी दिसून आला नाही. तर दुसरीकडे गेल्यावर्षी शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पादरम्यान अभूतपूर्व गोंधळ घालणारे विरोधकही शांततेच्या भूमिकेतच दिसून आले. एकूणच यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे रटाळ प्रस्तुतीकरण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या तर विरोधकांनी गेल्यावर्षी सारखे निलंबन होऊ नये या भीतीने शांतच बसण्याची भूमिका घेतली. भाजप सरकारचे हे तांत्रिकदृष्ट्या शेवटचे बजेट असल्याचे बोलले जात आहे.

निलंबनाच्या भीतीने विरोधक शांतच
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी टाळ वाजवित माऊलीचा, हरिनामाचा गजर सुरु केला. विठ्ठल नामाचाही अधून मधून गजर करत गणपतीच्या आरत्या आणि घालीन लोटांगणसह शिमग्याच्या बोंबाही मारल्या होत्या. अर्थमत्र्यांचे भाषण सुरु असताना त्यांच्यासमोर बॅनर फडकविले होते. मात्र अर्थमंत्र्यांनी आपले संयमित आणि दणकेबाज भाषण करत गोंधळातही विरोधकांवर टोलेबाजी केली होती. त्यामुळे ९ आमदारांचे निलंबन केले होते. या भीतीने विरोधक यावेळी शांतच बसल्याचे दिसून आले.

जलसंपदा मंत्र्यांचा पाणीपुरवठा!
काही महिन्यापूर्वी अर्थमंत्र्यांच्या घशाची शस्त्रक्रिया झाल्याने अर्थसंकल्प सादर करताना त्यांना अनेकदा पाणी प्यावे लागले. दर १० ते पंधरा मिनिटांनी त्यांना पाणी देण्याचे काम त्यांच्या शेजारी बसलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन करत होते.प्रत्येक वेळी महाजन पाणी देत असताना विरोधकांकडून खोचक टिपण्या केल्या जात होत्या.

माजी अर्थमंत्र्यांचा हिरमोड
अर्थसंकल्प सादर करत असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच पण काही शेरोशायरीचा वापर सुधीर मुनगंटीवार यांनी केला. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांवरील एक कविता सादर केली तेंव्हा विरोधकांनी बोंडअळी, बोंडअळी असे म्हणत आरोळी ठोकली. पहिला भाग झाल्यावर मुनगंटीवार यांनी एक शेर मारला त्यावेळी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी उभे राहत बोलण्याची परवानगी मागितली मात्र त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी एकसाथ ओरडायला सुरुवात केली. यावेळी मुनगंटीवार यांनी ,’पाटील साहेब मी तुमची ९ अर्थसंकल्पाची भाषणे ऐकली आहेत, तुम्ही खाली बसा तुमच्यासाठी मी ४-५ शेर घेऊन आलोय’ असा टोला मारला. वळसे पाटील यांनी जयंत पाटलांना खाली बसण्याची सूचना केल्यांनतर ते खाली बसले.