बाली, इंडोनेशिया । आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे. तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी केले.
सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर रविवारी संपन्न झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. लहाने बोलत होते. संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले यावेळी उपस्थित होते.
अवयवदानाच्या चळवळीची गरज
वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. गायकवाड यांनी लिहलेल्या आकाशपंख, थरार उड्डाणाचा, मााझे अंदमान या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. त्याचप्रमाणे डॉ. शुभा साठे यांच्या त्या तिघी, सुमन मुठे यांच्या सहकार चळवळीतील महिला या पुस्तकाचेही प्रकाशन झाले.
मराठीला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
भाषा बाजारपेठेत उभी राहिल्याशिवाय मोठी होत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न मराठी भाषेला अधिक व्यावहारिक आणि लोकाभिमुख करण्याचा आहे. त्याच भूमिकेतून हे संमेलन आरोग्य या विषयाभोवती गुंफले आहे. मराठी ज्ञानभाषा झाली नाही तर इंग्रजी शरणात ही आपली अगतिकता ठरणार आहे, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड यांनी सांगितले.
…तर भाषा समृद्ध होणार नाही
विश्व साहित्य संमेलनाने धारणाही वैश्विक करायला हव्यात. कारण अभिव्यक्तीची माध्यमे वाढत असताना विचार आक्रसला जातोय. गौरी लंकेश यांची हत्या आणि डॉ. मेधा खोले यांनी दाखल केलेला एफआयआर ही याची ठळक उदाहरणे आहेत. मराठी व्यापक झाल्याशिवाय भाषा समृद्ध होणार नाही. 21 शतकातील प्रगती आणि त्याचवेळी मध्ययुगीन मानसिकता हे दुभंगलेपण हे समाजासमोरचे आवाहन आहे, असे संजय आवटे यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात वैद्यक साहित्यावर परिसंवाद झाला. यात पत्रकार संतोष आंधळे, प्रा. डॉ. वासंती वैद्य, सरल कुलकर्णी, डॉ. अरुणा पाटील, सुमन मुठे सहभागी झाले होते.