अर्थसंकल्प लघु व मध्यम उद्योगांना उभारी देईल – राहुल चिंचोळकर

0

जीएसटीवर चर्चासत्राचे आयोजन

पिंपरी : सरकारचा 2018 चा अर्थसंकल्प हा कायद्यातील बदल करणारा आहे. या संकल्पाचे दूरगामी परिणाम चांगले होणार आहेत. लघु व मध्यम उद्योगांसाठी फायदेशीर ठरणारा बदल सरकारने अर्थसंकल्पात केला आहे. त्यामुळे काहीसा गोड व तर काहीसा तिखट असणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. यंदाचा अर्थसंकल्प लघु व मध्यम उद्योगांना भविष्यात उभारी देईल, असे मत सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंटंट राहूल चिंचोळकर यांनी व्यक्त केले. आयआयसीएमआरमध्ये ‘भारतीय अर्थसंकल्प 2018 – जीएसटी व अर्थव्यवस्थेवरचे दूरगामी परिणाम’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय विश्‍लेषणात ते बोलत होते.

उद्योगांसाठी अर्थसंकल्पात सकारात्मकता
राहुल चिंचोळकर म्हणाले की, लघु व मध्यम उद्योगांना यंदाचा अर्थसंकल्प फायद्याचा ठरणार आहे. रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या सरकारच्या बदलत्या निर्णयामुळे परिस्थिती झपाट्याने बदलणार आहे. कर प्रणालीतील बदलांसह विविध क्षेत्रातील तरदूत पाहता उद्योग क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात सकारात्मकता दिसत आहे. फास्टफूड, रेडी टू इट पदार्थ, फळे, ज्यूस, सिनेमा तिकीट, सौंदर्य प्रसाधने, एलसीडी, एलईडी टीव्हीच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर जनजागृ व्हायला हवी.

यावेळी आयआयसीएमआर संस्थेचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, सी. ए. सागर पाटील, सी. ए. आनंद भाटे, आयआयसीएमआर संस्थेच्या व्यवस्थापन विभाग प्रमुख अ‍ॅड. मनिषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अर्थसंकल्प नक्कीच फायद्याचा ठरणार
अर्थसंकल्पाचा लघु, मध्यम, उद्योग क्षेत्र व नागरिकांवर कसा व काय परिणाम होईल, याविषयावर बोलताना सी. ए. पाटील म्हणाले की, समाजातील सर्व घटकांच्या विकासावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी, लघु व मध्यम उद्योग तसेच पायाभूत क्षेत्र यांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे. जीएसटी ही सर्वोत्तम करप्रणाली आहे. मात्र, जीएसटीमुळे महसुली तुटीवर आणि राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पावर परिणाम होणार आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी करात देण्यात आलेली सवलत स्वागतार्ह आहे. दीर्घकालीन प्रक्रियांच्या आणि लाभांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड सी.ए. असोसिएशनचे नवे अध्यक्ष व सचिव यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.