अर्थसंकल्प लोकांत पोहोचवा!

0

नरेंद्र मोदींचा भाजप खासदारांना आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प लोक कल्याणकारी असून, त्याबाबत लोकांत जाऊन जनजागृती करा, तो लोकांना समजावून सांगा. सरकारच्या योजना लोकप्रिय बनवा, अशा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना दिला. शुक्रवारी मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या खासदारांची व संसदीय दलाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत 2019च्या निवडणुकांसाठी त्यांनी काही कानमंत्रही खासदारांना देत, तयार राहण्याचे आदेश दिले. सरकारच्या योजना, आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्पच आपल्या विजयाचे शिल्पकार ठरतील, असा विश्‍वासही मोदींनी याप्रसंगी व्यक्त केला.

खासदारांना मतदारसंघात जाण्याचे निर्देश
या बैठकीला हजर राहिलेल्या खासदारांनी सांगितले, की खासदारांचे यशच पक्षाचा विजय निश्‍चित करत असते. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक खासदाराने सरकारच्या गरिबोन्मुख, शेतकरी कल्याणाच्या योजनांना लोकांत पोहोचविण्यासाठी यापुढे जोरदार प्रयत्न करावेत. पुढील महिनाभरात आपल्या मतदारसंघातच थांबा व तेथे लोकांना केंद्रीय योजना, अर्थसंकल्पातील तरतुदी यांची माहिती द्या, असे निर्देशही मोदींनी दिले आहेत. 2018 मध्ये काही राज्यांतील निवडणुका, 2019ची लोकसभा निवडणूक पाहाता, मोदींचा हा सल्ला महत्वपूर्ण मानला जात आहे. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की पंतप्रधानांनी खासदारांसोबत अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. खास करून गरीब, शेतकरी यांच्या जीवनावर या अर्थसंकल्पाचा कसा सकारात्मक प्रभाव पडणार आहे, याची माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विमा योजनेचा 10 कोटी कुटुंबाना कसा लाभ होणार आहे, याबाबतही पंतप्रधानांनी सांगितले, असे कुमार म्हणाले.

राहुल गांधींचे राजकारण लोकशाहीविरोधी : शहा
पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल यांनी राफेल खरेदी प्रकरणाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करत संरक्षणमंत्री तसेच पंतप्रधान यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. राहुल गांधी यांचे हे वर्तन लोकशाहीविरोधी असल्याचे अमित शहा म्हणाले. पंतप्रधानांच्या भाषणातही काँग्रेसच्या खासदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, राफेल विमान खरेदी ही राष्ट्रहिताची बाब असून, त्यावर राजकारण करणे चुकीचे आहे, असा टोलाही शहा यांनी राहुल गांधी यांना हाणला. राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलत असताना, काँग्रेससह डाव्या पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला होता. संपूर्ण भाषणादरम्यान हा गोंधळ सुरु होता. या प्रकाराबद्दल शहा यांनी आपल्या भाषणात तीव्र नाराजी व्यक्त करत, काँग्रेससह डाव्या पक्षांवरही टीका केल्याची माहिती अनंत कुमार यांनी दिली. या बैठकीला पक्षाध्यक्ष शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.