मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा आज पहिलाच अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले असल्याने अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानभवन प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. शिवयारांच्या चरणी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. थोड्याच वेळात 10.30 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर अजित पवार विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
सरकारने दिलेल्या किती आश्वासनांची, घोषणांची अंमलबजणावणी होणार हे देखील आजच्या अर्थसंकल्पातून समोर येईल. तसेच शेतकरी, गृहिणींच्या विशेषत: शहरातील महिलांना सरकारकडून अपेक्षा आहेत. सार्वजनिक वाहतूक फ्री करावी, महागाई कमी करावी, सुरक्षितता वाढवावी अशा अनेक मागण्या महिलांनी केल्या आहेत. यासोबतच करदाते आणि उद्योजकांना नवीन काय मिळणार? हे देखील पाहावं लागेल. मंदीची स्थिती, घटणारा विकासदर हे आव्हान अजित पवारांसमोर आहे.
आर्थिक पाहणी अहवाल चिंताजनक
आर्थिक मंदीमुळे राज्याचा विकास दर 7.5 टक्क्यांवरुन 5.7 टक्के राहिल, असा अंदाज या आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे. तसेच राज्याचा कृषी विकास दर 3.1 टक्के राहिल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं यात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात दीड लाख रोजगार कमी झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. याशिवाय राज्याचा बेरोजगारीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. याबाबतीत देशात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्याचा बेरोजगारी दर 8.3 टक्के आहे.