अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी वगळता महापालिका हद्दीत वास्तव्यास असणार्‍या सर्व विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी अर्थसहाय्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत इतर कल्याणकारी योजनेंतर्गत दहावीमध्ये 80 ते 90 टक्के गुण संपादन करणार्‍यांना दहा हजार तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये मिळतील. इयत्ता बारावीमध्ये 80 व 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

नागरी सुविधा केंद्रात अर्ज उपलब्ध
2017-2018 या आर्थिक वर्षाकरिता या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज करावेत. हे अर्ज महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये मिळतील. त्यासाठी 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल. अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्येच जमा करावेत. अर्ज जमा केल्याबाबतची पोहोच पावती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2015-16 मध्ये 1 हजार 956 विद्यार्थ्यांना 2 कोटी 34 लाख 70 हजार आणि सन 2016-17 मध्ये 4 हजार 912 विद्यार्थ्यांना 4 कोटी 26 लाख 15 हजार बक्षिस रकमेपोटी अर्थसहाय्य वाटप करण्यात आले होते.

लाभासाठी लागणारी कागदपत्रे!
अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील वास्तव्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, लाईट बिल, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, मिळकत कर पावती, आधारकार्ड, रजिस्टर्ड भाडेकरारनामा, झोपडपट्टी ओळखपत्र (फोटो पास) इत्यादीपैकी एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्याने अर्जासोबत चालू वर्षी इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण असल्याबाबत गुणपत्रिकेची प्रत, अर्जदाराच्या आधारकार्डची प्रत, बँक खाते क्रमांक व पासबुकची प्रत ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.