महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना पुन्हा एकदा लातूरमध्ये घडली आहे. आजवर कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत होते. परंतु, आता या बळीराजाच्या लेकीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू लागल्या आहेत. राज्यात सरकार कोणत्या पक्षाचे आहे, हा मुद्दा या घटनेनंतर तकलादू ठरलेला आहे. शेतकर्याच्या मुलीच्या आत्महत्येच्या घटनेने केवळ राजकारण्यांनाच नव्हे, तर अखंड समाजाला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथे एका शेतकर्याच्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. शीतल व्यंकट वायाळ असे या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. शीतलच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते. गेली दोन वर्षे शीतलचे बाबा तिच्या लग्नासाठी पैशांची जमवाजमव करत होते. मात्र, काही केल्या हुंड्याची भली मोठी रक्कम त्यांच्याने जमा होईना. दुसरीकडे आधीच कर्जबाजारी असलेल्या शीतलच्या वडिलांना सावकारासह कुणीच पैसे द्यायला तयार नव्हते. बापाची ही फरफट शीतला पाहवली नाही आणि तिने स्वत:चं आयुष्यच संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षी याच भिसेवाघोली गावात मोहिनी भिसे या शेतकर्याच्या मुलीनेही याच कारणासाठी आत्महत्या केली होती. हुंड्याच्या रकमेने घेतलेला शीतलच्या रूपातला हा दुसरा बळी होता. शीतलने आत्महत्येपूर्वी पत्रात आत्महत्या केलेल्या कारणांचा उल्लेख केला आहे.
मी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वडिलांना माझ्या लग्नासाठी कुणीही कर्ज देण्यास तयार नाही माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असं शीतलने पत्रात म्हटलं आहे. पण याच पत्राची सर्वात पहिली ओळ अधिक भीतीदायक आहे. मी शीतल व्यंकट वायाळ, अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडील मराठा कुणबी समाजात जन्मले आहेत. शीतलला आत्महत्येच्या चिठ्ठीची सुरुवात आपण मराठा कुणबी समाजाचे आहोत हे सांगून करावीशी का वाटली असेल? या प्रश्नाने पुरोगामी महाराष्ट्रातील अनेकांना आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं आहे. शीतलने त्या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. याला शीतलचं बलिदान न ठरवण्याचा गुन्हा कुणीही करू नये, तर या समाजातील रुढी, परंपरा आणि हुंड्याच्या कुप्रथेने घेतलेला बळी असंच म्हणायला हवं.
खरंतर शीतलने आत्महत्या करून ती ज्या समाजात जन्मली होती त्या समाजाला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलंय. मोठेपणा मिरवण्यासाठी आणि पैशांचा माज दाखवण्यासाठी रुढी, परंपरांच्या नावाखाली अजून किती काळ मुलीच्या बापाला नाडलं जाणार आहे, असा थेट प्रश्न शीतलच्या आत्महत्येमुळे उभा राहिला आहे. शीतलच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दुसर्याच दिवशी अजून एक बातमी आली. मराठा आरक्षणासाठी आता अर्धनग्न मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची ती बातमी आहे. यापूर्वी निघालेले मराठी क्रांती मूकमोर्चे अनेक कारणांनी प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहेत. लाखो रुपये खर्चून हे मोर्चे महाराष्ट्रभर काढले गेले. मोर्चानिमित्ताने करोडो रुपये जमवले गेले. इतके पैसे जमा होत असतानाच त्याच मराठा समाजातील एका मुलीचा बाप लेकीच्या लग्नासाठी दारोदार पैशांसाठी भटकत होता. पण कुणीही त्याला कर्ज देत नव्हतं. आधीपासूनच आर्थिक स्थिती चांगली असतानाही शीतलच्या होऊ घातलेल्या नवर्याला हुंडा कशासाठी हवा होता? हे सगळे प्रश्न आता भीषण रूप घेऊन अर्धनग्न मोर्चा काढणार्यांसमोर उभे ठाकले आहेत. त्या मोर्चेकरांना या प्रश्नांची उत्तरं कृतीतून द्यावीच लागतील.
शीतलचा मृत्यू ज्या मराठवाड्यात झालाय त्याच मराठवाड्याचे भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं शाही लग्न अद्याप थंडावलेलं नाही. इतका पैसा लग्नावर खर्च करत असताना दानवेंना शीतलच्या बाबांची आणि शीतलसारख्या अशा अनेक लेकींची आर्त साद कशी ऐकू आली नाही? या प्रश्नाचं उत्तरदेखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना द्यावं लागणार आहे. कारण जालनामध्ये निघालेल्या मराठा मूकमोर्चात रावसाहेब दानवे सामील झाले होते. विरोधी पक्षांचीही गत काही वेगळी नाहीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शीतलच्या कुटुंबीयांना भेटले. त्यांनी एक लाखाची तातडीची मदतही दिलीय. हीच मदत दोन वर्षांपूर्वी मिळाली असती, तर शीतल आज हयात असती. पण इथल्या राजकारण्यांना सारंच उशिरानं उमगतं, त्याला कोण काय करणार?
खरंतर या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्या प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालंय. मागासवर्गीय नितीन आगे या विद्यार्थ्याची मराठा समाजातील मुलीवर प्रेम केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या दहाव्या दिवशीच नगरमध्ये मराठा समाजाने एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा मोर्चा त्या मुलीच्या पुनर्वसनाच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. त्या मोर्चात काही वेळातच लाखभर रुपये निधी म्हणून जमा झाले होते.
या घटनेनंतर कोपर्डीची घटना घडली आणि इथूनच मग मराठी क्रांती मूकमोर्चाने जन्म घेतला. हा सगळा तपशील पाहता या काळात कैक लाखांची आर्थिक उलाढाल झालेली आहे. मग ती बाइक रॅली असो किंवा मूकमोर्चा असो… या मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने पैशांचं प्रदर्शन महाराष्ट्राला घडलेलं आहे. इतकी श्रीमंती असतानाही शीतलला आत्महत्या करावी लागते, याचा आता प्रामाणिकपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. अर्धनग्न मोर्चा काढताना त्या अर्धनग्नतेमागील नग्न सत्य पडताळून पाहण्याची वेळ आलेली आहे. कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या न्यायासाठी आंदोलन करणारे तरुणच हुंडा मागून शीतलसारख्या निष्पाप मुलीला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय ठेवत नसतील, तर या विरोधाभासाला आपण काय म्हणणार आहोत? शाहीलग्नाचा थाट करताना मुलीच्या वडिलांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करायचा नाही आणि केवळ दिखावेपणासाठी मुलीकडच्या लोकांना वेठीस धरायचं, हा नेमका काय प्रकार आहे? ज्या समाजाच्या उन्नती आणि विकासासाठी राज्यव्यापी मोर्चांचं आयोजन केलं जातंय त्याच समाजातील मुली निष्कारण मृत्यूला कवटाळत आहेत, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. तीच खरी शीतलला आदरांजली…!
राकेश शिर्के – 9867456984