पुणे- शिक्षकाने सांगितलेले चित्रे काढली नाही म्हणून विद्यार्थ्याला अर्धांग वायूचा झटका येई पर्यंत मारणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल (एसएसपीएमएस) या शाळेच्या चित्रकला शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. संदीप गाडे असे या शिक्षकाचे नाव आहे.
एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यानी प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला.एवढा प्रकार घडून देखील शाळा प्रशासनाने माहिती प्रसन्नच्या घरी कळवली नाही. प्रसन्नला दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी घेऊन गेल्यावर पालकांना घडलेला प्रकार समजला.
या सगळ्या प्रकारानंतर शिक्षकाने केलेल्या मारहाणीविरोधात प्रसन्नच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी संदीप गाडे या शिक्षकाला अटक केली आहे. प्रसन्नच्या पालकांनी जेव्हा शाळा प्रशासनाला हा सगळा प्रकार लक्षात आणून दिला तेव्हा शाळेनेही संदीप गाडेला निलंबित केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असेही आश्वासन मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिले होते.