अर्ध्यातासात 16 विषयांना मंजुरी

0

जळगाव । जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी 10 रोजी नंदीनीबाई बेंडाळे महाविद्यालयाजवळील लेवा बोर्डीग सभागृहात पार पडली. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर एकुण 19 विषयापैकी 3 विषय वगळता 16 विषयांना केवळ अर्ध्या तासात मंजूरी देण्यात आली. किरकोळ गोंधळ वगळता सभा शांततेत पार पडली. अजेंड्यावरील 13 क्रमांकाचा विषय कार्यकारी मंडळाच्या निर्णयाविरुध्द अपिल असल्यास त्यावर विचार करणे हा होता, या विषय अजेंड्यावरुन सभेत वगळण्यात आला. 17 व्या क्रमांकाचा वैधानिक लेखापरीक्षक यांनी लेखा परीक्षणात घेतलेल्या शेर्‍यानुसार सभासदांना कर्ज अदा करतांना सभासदांकडून स्टॅम्प पेपर घेण्याबाबतचा विषय होता, हा विषयावर सदस्यांनी हरकत घेतल्याने या विषयाला अजेंड्यावरुन कायम वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 19 व्या क्रमांकाचा आयत्या वेळच्या विषयांना मंजूरी देण्याचा विषय रद्द करण्यात आला.

2 कोटीचा निव्वळ नफा
माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांच्या पतपेढीला वर्ष 2016-17 मध्ये 2 कोटी 7 लाख, 2 हजार 242 इतका निव्वळ नफा झालेला आहे. कार्यकारी मंडळाने यावर्षी 15 टक्के लांभाश वाटपाची शिफारस केल्यामुळे जमा नफा वाटपाची शिफारस करण्यात आलेली आहे. यात राखीव निधी 25 टक्के, शेअर लाभांश 15 टक्के, लाभांश समभाग 1 टक्के, इमारत निधी शिल्लक नफा 30 टक्के, आयकर व आकस्मित नफा 5 टक्के, धर्मदाय निधी 5 टक्के, सभासद कल्याण निधी 40 टक्के आहे.

नोटबंदीचा फटका
केंद्र शासनाने 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पतपेढीच्या वसुलीत आणि लाभात घट झाल्याने यावर्षी वार्षीक नफ्यात घट झाल्याचे सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. नफ्यातील रकमेचा सभासदांच्या कल्याणासाठी वापर करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. कर्जाची मर्यादा वाढविणे, व्याजदर कमी करणे, परतफेडीची मुदत वाढविणे आदी प्रश्‍न सभासदांनी सर्वसाधारण सभेत मांडले.

संस्था इमारत उभारणीस विरोध
पतसंस्थेच्या इमारतीच्या बांधकामाचा विषय सभेत मांडण्यात आला. मात्र काही सभासदांनी याचा विरोध केला. संस्थेच्या इमारत बांधणीत खर्च करण्यापेक्षा सभासद पाल्यांसाठी वस्तीगृह बांधले जावे असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आली नाही म्हणून काही सभासदांनी कार्यकारिणीला विचारणा केली. त्यावर अध्यक्षांनी सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस प्रतिमा पूजनाची प्रथा नसल्याचे उत्तर दिले.

यांची होती उपस्थिती
सभेस 11 हजार 770 सभासदांपैकी 9 हजार 97 सभासद उपस्थित होते. प्रत्येक सभासदांना प्रत्येकी पाचशे रुपये भत्ता देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष शालिग्राम भिरुड, उपाध्यक्ष अलका पाटील, मानद सचिव रविंद्रनाथ बाविस्कर, खजिनदार जयंत चौधरी, संचालिका शुभांगिनी महाजन, संचालक भीमराज सपकाळे, गजानन गव्हारे, मनोहर सुर्यवंशी, नंदकुमार पाटील, शरद बारी, हेमंत चौधरी, अजय देशमुख, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.