अर्ध्या आकाशाचे मोकळे सत्य

0

देशोदेशीच्या समाजव्यवस्थेला पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेने गोत्यात आणलेले जगापुढे एव्हाना दिसून आलेलेच आहे. समाजाच्या एकूण लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांचे हे रुढीप्रियतेत पिळून निघणे व त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बाईच्या जगण्याला अर्थच नाही का?, या विचारांनी त्यासाठीच्या बंडाळीचे बीजारोपण केलेले आहे. स्थलकालपरत्वे थोड्याफार फरकाने ही बंडाळी काहीशी संथपणे व जोरकसपणानेही समाजाला जाब विचारणारे प्रश्‍न करू लागली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयालाही याच बंडाळीची दखल घेत पाच धर्मांच्या न्यायाधीशांचा सहभाग असलेल्या न्यायपीठाची नियुक्ती करून सत्यान्वेशासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. तद्ववतच तिकडे महिला खासदार संसदेत अपत्यांना स्तनपान देऊ शकतात, असा कायदा ऑस्ट्रेलियात संमत झाला आहे. समाजातला एक स्वयंभू घटक म्हणजे महिलेला तिच्या मातृत्वाच्या अनुषंगाने स्तनपानाचा अधिकार कायद्याने दिला गेला.

मुस्लीम समुदायातील तिहेरी तलाकाच्या प्रथेला धार्मिक श्रद्धेचे अधिष्ठान आहे का?, असले तरी त्यामुळे महिलेला माणूस म्हणून जगणे नाकारणारे ते कसे असू शकते?, या मुद्द्याला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कसोटी लावलेली आहे. भारत असो की, ऑस्ट्रेलिया, या सगळ्या मतेमतांतरांच्या केंद्रस्थानी महिला म्हणजे समाजाचे अर्धे आकाश आहे, ‘बाईमाणूस’ आहे! मराठीतला हा ‘बाईमाणूस ’ शब्द बोलण्यापुरते तरी बाईला ती ‘माणूस’ असल्याचे मान्य करतो. मात्र, वास्तवात देश, धर्म कोणताही असला तरी तेथील प्रत्येक बाई ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती आहे, हे समाजाला मान्य करायला लावणारा हा खरा पेच आहे.

मानवी इतिहासाबद्दल सांगितले जाते की, माणसाला अन्नधान्य पिकवण्याची अक्कल आल्यानंतर तो स्वत:च्या मालकीचे शेत राखू लागला. ती शेताची मालकी अबाधित राहावी म्हणून आधी विवाह संस्था व त्यातून कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली. या विवाहसंस्थेने व कुटुंबव्यवस्थेने त्याच्या शेताला वारस दिले.तत्कालीन समूहव्यवस्थेनेही पुरुषाच्या मनगटाचे बळ महत्त्वाचे ठरवत समाजाच्या परंपरा अधोरेखित केल्या. विविध धर्म व धार्मिकतेचा विकास त्यानंतरच्या कालखंडात झाला. तडजोडींची स्वाभाविकता व अपत्यवत्सलतेच्या कर्तव्याप्रतीची प्रगल्भ जाण, या पार्श्‍वभूमीवर पुरुषी वर्चस्वाने मात केलेली दिसते.

सध्याच्या प्रगत व आधुनिक युगातही कवितेच्या भाषेत सांगायचे तर ‘मौनाचा फुटतो ऊर… मौनाच्या गळ्यास बिलगून…’ अशा मानसिकतेत बाईमाणसाचे जगणे नियतबद्ध झालेले दिसते. ती आपल्या माणसांबद्दलची तिची प्रतिबद्धता समजून न घेता आजही त्याचाच फायदा घेत पुरुषी वर्चस्वाचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानली जाते आहे. तसे नसते तर ऑस्ट्रेलियातील खासदार लारीसा वाटर्सला सभागृहातील स्तनपानाच्या परवानगीसाठी आंदोलन करावे लागले नसते. आजही भारतात स्तनदा मातेकडे पाहणार्‍या पुरुषी नजरा सुधारण्याची ठाम खात्री कुणीच देऊ शकणार नाही. या बुरसटलेपणालाच एका अर्थाने आव्हान देत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुस्लीम महिलांना न्याय अपेक्षित आहे. धर्म कोणतेही असले, तरी धार्मिकतेच्या सार्‍या व्यवस्था पुरुषांच्याच ताब्यात आहेत. त्यातूनच धार्मिक असोत की, सामाजिक, सर्वच रुढी-परंपरा पुरुषांच्या बाजूने झुकलेल्या किंबहुना झुकवलेल्या आहेत. लारीसा वाटर्सच्या आंदोलनाने दिलेल्या या धड्यातून आता नोकरीच्या ठिकाणीही आई तिच्या बाळाला घेऊन जाऊ शकेल, अशी मोकळीक मिळणारे वातावरण तयार होणे अपेक्षित आहे. तिची अपत्यवत्सलता तिच्याचसाठी अभिशापासारखी ठरू नये, हा मुद्दा धुरीण पुरुषांनी लक्षात घेतला पाहिजे.

धार्मिक श्रद्धा, सामाजिक रुढी-परंपरा माणसांच्या जगण्यातली उदात्तता फुलवणार्‍या असतात, नराचा नारायण व्हावा म्हणून असतात. मात्र, सध्याच्या जगातील नारायणनरांनी आपमतलबीपणाने त्या उदात्ततेलाच वर्षानुवर्षे हरताळ फासलेला आहे. असे असले तरी भारतात जसे सतीप्रथेविरोधात समाजमन अनुकूल होत गेले तसेच ते बाईमाणसाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख देण्यात पुढाकार घेण्यापर्यंत उदारवादी व्हावे, विविधतेत एकतेचा अभिमान मिरवताना भारतीय मुस्लीम महिलांनाही या उदारवादाने सामावून घ्यावे, त्यासाठी अन्य धर्मीयांनी त्यांना जाणतेपणाने बळ द्यावे.परमेश्‍वरपारायणतेच्या भंपक कल्पनांच्या आडून लादले जाणारे महिलांचे दुय्यमत्व नाकारण्याचे बळ महिलांनी मिळवण्यासाठी सामाजिक मानसिकतेवर सुधारणावाद्यांनी जाणीवपूर्वक आघातही करावेत, त्याचवेळी निधर्मीवादाला आपण दिलेले कायदेशीर अधिष्ठान अशा परिवर्तनासाठी कारणी लावता येण्याची कुवत सुधारणावाद्यांमध्येही यावी. या अपेक्षा म्हणजेच भारतीय समाजातील अर्ध्या आकाशाचे मोकळे सत्य आहे.