अर्ध्या तासातच इंग्रजीची प्रश्नपत्रिका ‘लिक!’

0

रमाबाई आंबेडकर विद्यालयातील धक्कादायक प्रकार


जळगाव: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतल्या जाणार्‍या बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती असलेल्या इंग्रजी विषयाने परीक्षेला सुरुवात झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही कॉपीची परंपरा कायम राहिली. मित्रांनी, पालकांनी कॉपी पुरविण्यासाठी धडपड केल्याचे चित्र पाहायला मिळाले. धक्कादायक प्रकार म्हणजे परीक्षाच्या अर्ध्या तासानंतरच शिक्षकांनी सोडविलेली प्रश्नपत्रिका उत्तरसहित बाहेर आली. काही मिनिटातच तिच्या झेरॉक्स कॉपी विक्री करण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार शहरातील रमाबाई आंबेडकर विद्यालयात दिसून आला. दुसरीकडे राज प्राथमिक विद्यालय, संस्कृती विद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, अँग्लो उर्दू विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. संरक्षण भिंतीवरून जीवघेण्या कसरती करत कॉप्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या गेल्या.

दगडाला कॉपी, विद्यार्थिनी जखमी

नूतन मराठा परीक्षा केंद्राच्या मागील बाजूला कॉपी पुरवण्यासाठी तरुणांनी मोठी कसरत केल्याचे दिसून आले. कॉपी पुरविण्यासाठी अनेक क्लुप्त्या केल्याचे दिसून आले. चक्क दगडाला दोर्‍याने कॉपी बांधून ती वर्गाच्या दिशेने फेकले. त्यामुळे खिडकीजवळ बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीला तो दगड लागला. त्यामुळे विद्यार्थिनी जखमी झाली. मुलीला दगड लागल्याचे लक्षात येताच टवाळखोर मुलांनी तेथून पळ काढला.

आदेशाला केराची टोपली

बोर्डाच्या परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. मात्र शहरातील नूतन मराठा महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालय, कन्या शाळा, बाहेती महाविद्यालय, अँग्लो उर्दु हायस्कूल, मेहरूण परिसरातील राज विद्यालय, संस्कृती विद्यालय व रमाबाई आंबेडकर विद्यालयाजवळील झेरॉक्सची दुकाने उघडीच होती. यावरून शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा पाऊस

शहरातील केंद्रांवर बारावीचा पेपर होता. इंग्रजीचा पेपर असल्यामुळे अक्षरश: कॉप्यांचा पाऊस दिसून आला. अनेक केंद्रांवर काही तरुणांनी खिडक्यांमधून कॉप्या पुरवण्याचा प्रताप केला. केंद्रांवर बैठे पथक आणि फिरते पथक असतानाही सर्रासपणे कॉप्या चालवून कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जा उडवला. दरम्यान, पोलिसांनी काही टारगट तरुणांचा चोप दिल्याचेही चित्र दिसून आले.

टवाळखोरांवर पोलिसांचा चोप

शहरातील मेहरूण परिसर व नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाहेर काही टवाळखोर मुलांनी संरक्षण भिंती ओलांडून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. त्यांना उपस्थित पोलिसांनी दंडुक्याचा मार देत चोपले. खिडकीतून कॉप्या फेकण्याचा प्रयत्न टवाळखोर मुलांनी केला. परीक्षा केंद्राबाहेर निर्भया पथकाचे वाहन होते. पथकाचे वाहन बघताच बाहेरील मुलांनी पळ काढला तर महाविद्यालयात कॉपी पुरवण्यासाठी गेलेल्या मुलांना पथकाचा दंडुका बसला. यावेळी बाहेर लावण्यात येणार्‍या खाद्य पदार्थांच्या गाड्या परिक्षा काळात बंद ठेवण्याची तंबी पथकातर्फे देण्यात आली.