आळंदी : विश्वशांती केंद्र-आळंदी ,माईर्स एमआयटी-पुणे आणि आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने 4 ते 6 जुलै या कालावधीत इंद्रायणी नदी घाटावरील श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच इंद्रायणी नदी घाटावर समाज प्रबोधनाची पर्वणी अंतर्गत लोकशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचे विश्वशांती केंद्र अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
व्याख्याने प्रवचन
युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुसाठी लोकशिक्षणात व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, भक्तीसंगीत, भजन सेवा होणार आहे. 4 ते 6 जुलै या काळात महोत्सव होत आहे. यात रोज साडे पाच वाजता अनुक्रमे प्रज्ञाचक्षू हभप गणपत महाराज जगताप, हभप डॉ. नारायण महाराज जाधव व परभणी येथील हभप ठाकुरबुवा दैठणेकर आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची व्याख्याने प्रवचन सेवा होत आहे.
सात वाजता च्या सत्रात राष्ट्रीय कीर्तनकार, पर्यावरण व व्यसनमुक्तीचे प्रणेते हभप ज्ञानेश्वर माऊली वाबळे गुरूजी, प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या भगवतीताई दांडेकर (सातारकर), ज्ञानेश्वरीचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
रात्री सव्वा नऊच्या सत्रात संगीत अलंकार राधाकृष्ण गरड गुरूजी यांचा भक्ती स्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम होईल. मावळ येथील अरूण महाराज येवले व सहकारी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे व रमेशबुवा शेनगांवकर यांचा सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळच्या सत्रात डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, आसाराम महाराज बढे व अच्यूत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तन सेवा होत आहे. महोत्सवात दैनंदिन काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ देण्यासाठी एमआयटी हनुमान भजनी मंडळ सेवारत असल्याचे समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी सांगितले.