आळंदी : स्वानंद सुखनिवासी श्री विष्णुबुवा जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी पूर्ती महोत्सवाची सांगता हरिनाम गजरात ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर यांचे काल्याचे कीर्तनाने उत्साहात झाली. खान्देशकर वारकरी भाविकांच्या वतीने यावेळी महाप्रसादात पुरणपोळी भोजन वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. अलंकापुरीत झालेल्या ज्ञानभक्ती यज्ञाची सांगता झाल्याने आळंदीतून भाविकांनी परतीचे प्रवासास सुरुवात केली. खान्देशातील वारकर्यांनी परंपरेला साजेसे असे पुरणपोळी भोजन देऊन सोहळ्याच्या सांगता महोत्सवाचा गोडवा वाढवला. पुरणपोळी भोजनाच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव व कौतुक येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खंजिनदार दीपक पाटील केले.
शोभायात्रेचे आयोजन
महोत्सवातील सांगतेच्या पूर्वसंध्येला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत मिरवणूक निघाली. यात हत्तीवर स्वानंद सुखनिवासी श्री विष्णुबुवा जोग महाराज यांची प्रतिमा, पालखी मिरवणूक शाही लवाजम्यात व हरिनाम गजरात निघाली. तत्पूर्वी येथील नगरप्रदक्षिणा मार्ग पाण्याचा वापर करून धुऊन काढण्यात आला. त्यावर विविध रंगांच्या सहाय्याने रंगावली काढण्यात आली. हत्ती, घोडे, बॅण्ड आदी पथकांनी मिरवणुकीत रंग भरला. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत झाले. इंद्रायणी घाटावरील जोग महाराज यांच्या समाधीस आकर्षक पुष्प सजावट केली होती. संस्थेची नवी इमारत विद्युत रोषणाई व रंगावलीने आकर्षण ठरली होती.
अलकांपुरी भारावली
महोत्सवात राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संगीतकारांची सेवा झाली. जोग महाराज मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना, सभागृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, राम गावडे, मंगला हुंडारे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, मुख्याधिकारी संतोष टेंगले आदी मान्यवरांनी महोत्सवाला भेट दिली. यशस्वीतेसाठी ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी शिक्षण संस्थेच्या आजी, माजी अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकारी, माजी विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले. पुणे जिल्हा महसूल व पोलिस प्रशासन तसेच आळंदी नगरपरिषदेनेही या महोत्सवास सहकार्य केले.