हरिनाम गजरात हैबतरावबाबा पायरीचे पूजन
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत 722व्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास ह. भ. प. श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या पायरी पूजनाने हरीनाम गजरात प्रारंभ झाला. हा सोहळा पाहण्यास आणि माउलींच्या दर्शनासाठी अलंकापुरीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. श्री गुरु हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी व पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर परिवारातर्फे प्रथेनुसार पायरी पूजन, श्रींची आरती, महानैवेद्य झाला. याप्रसंगी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी, दत्तात्रय केसरी यांनी वेदमंत्रोपचारात पौरोहित्य केले. श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीतील वारकरी भाविकांनी अभंग, आरती, मंदिर प्रदक्षिणा करून हरिनाम गजरात सोहळ्यास प्रारंभ केला. हैबतरावबाबा ओवरीत आरती झाली. त्यानंतर दिंडीने नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर परंपरेने महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच मालक आरफळकर यांच्या वतीने मानकर्यांना नारळ प्रसाद देण्यात आला.
ज्ञानेश्वरी कृपा तयावरी!
भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा तयावरी !! या ओवीप्रमाणे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणास आळंदीत अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. आळंदी मंदिरात अजानवृक्षेच्या छायेत भाविकांचा प्रतिसाद मोठा मिळत असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. देवस्थानचे सरपंच अभय टिळक यांच्यासह सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेस राज्यातून लाखो भाविक आळंदीत येतात.
मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
रविवारी (दि. 12) माउली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांतर्गत श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांचे महापूजा, महानैवेद्य, विना मंडपात किर्तन होणार आहे. याप्रसंगी आमदार सुरेश गोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, विलास ढगे, योगेश देसाई, संस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार रणदिवे, रामभाऊ रंधवे, भीमाजी घुंडरे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी नगरसेवक मृदुल भोसले, व्यापारी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, लक्ष्मण जाधव, मनोज तापकीर, कृष्णाजी डहाके, काळुराम कड, शांताराम घाडगे, मारुती महाराज कोकाटे, श्रींचे मानकरी दिनेश कुर्हाडे, संतोष मोझे, विठ्ठल घुंडरे आदींसह भाविक उपस्थित होते.