अलवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

0

चाळीसगाव । तालुक्यातील अलवाडी येथील परिसरातील शेत शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात घोड्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा चाळीसगाव तालुक्यातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कामागिरीमुळे शेतकरी व नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बिबट्याने हल्ला केल्याचे सकाळी उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.

वाड्यावरील मेंढपाळ कुटुंब प्रचंड भेदरले
तालुक्यातील अलवाडी येथे बाबुलाल धनगर हे मेंढपाळ असून त्यांचा देवानंद भिमराव पाटील यांच्या अलवाडी शिवारातील पिंपळे धरणाजवळील माळाच्या शेतावर मेंढ्याचा वाडा टाकला होता. मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान बिबट्याने असलेल्या घोड्यावर हल्ला केला. यावेळी घोड्याने दोन तोडून पळ काढत असतांना जागपासून 20 ते 25 फुट अंतरावर जावून बिबट्यांने पुन्हा हल्ला करून ठार केले. बिबट्याने हल्ला केल्यानंतर घोड्याचा एक पाय आणि पोट फाडून टाकले आहे. ज्यावेळी बिबट्याने घोड्यावर हल्ला केला त्यावेळी वाड्यावर असलेले बाबुलाल धनगर यांचा मुलगा चंदू धनगर यांच्यासह दोन महिला आणि दोन मुले यांनी हा हल्ला होत असतांना प्रत्यक्ष दर्शी होते. त्यामुळे चंदूसह महिला व मुले मोठ्या प्रमाणावर भेदलेले आहे. घोड्यावर हल्ला केल्याची घटनासंदर्भात तत्काळ वनविभागाला संपर्क साधुन सर्व हकीकत सांगितली.

सकाळीही दिसला बिबट्या
दरम्यान सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास अलवाड गावाच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या नाल्यामध्ये बिबटया काही शेतकर्‍यांना दिसल्यानंतर तेथून शेतकर्‍यांनी एकच धुम ठोकली होती. गेल्या आठवड्यात तालुक्यातील दरेगाव रस्त्यावलगत असलेल्या वरखेडे शिवारात बुधवारी 25 वर्षीय महिलेवर शेतात कापुस वेचत असतांना बिबट्याने हल्ला करून महिलेला ठार केले होते. बिबट्याने तालुक्यासह परीसरात आत्तापर्यंत तीन महिन्यात चार जणांचे बळी घेतले आहे तर काहींना जखमीही केले. वारंवार होणार्‍या घटनेमुळे परीसरातील नागरीक व शेतकर्‍यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण तयार झाले असून संतापही व्यक्त होत आहे.

शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
वारंवार होणार्‍या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकर्‍यांना शेतातील काम करण्यासही भीती वाटत असल्याने महावितरण कंपनीने चाळीसगाव तालुक्यातील कोणत्याही पद्धतीने रात्री भारनियमन करून नये व वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी जाळे टाकून बिबट्यांना तात्काळ पकडावे अशी विनंती शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी तालुका प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र उदासील असलेले वनविभाग व तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता आम्ही तालुक्यातील मुख्य रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.