जळगाव। अवतीभवतीच्या असामाजिक घटनांनी अस्वस्थता वाढत चालली आहे. मात्र त्याचवेळी ही अस्वस्थताच एक अलंकार आहे. सोन्यासारखी ती अंगावर मिरवावी. हीच अस्वस्थता कृतिशील रचनेची निर्मिती करेल आणि सांस्कृतिक आव्हाने मोडीत काढेल असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांनी केले. शहरातील परिवर्तन संस्थेच्यावतीने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित ’सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी मंचावर संचालक अॅड. विजय पाटील, रंगकर्मी मंजुषा भिडे, शेखर सोनाळकर उपस्थित होते.
आव्हाने होती; लढणारेही होतेच : पेठे यांनी यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक आव्हानांवर सूक्ष्म चर्चा करत आव्हानांचा सामना करण्यासाठी दशरथ मांझीसारखे बनून तयार राहण्याचे आव्हान केले. मी आव्हानांचे डोंगर फोडत राहील, असे ते म्हणाले. आईबापांनी कधी नाटकं पाहिली नाहीत, सिनेमे पाहिले नाहीत मग अशा आईबापांनी मुलांची चिंता लागते. तर ते जातील कुठे? मानसिक तणाव व बेबनाव वाढत चाललेय. यावर उपाय म्हणजे कला, नाटकांचाच आहे. आयडिओलॉजी संपली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पेठे पुढे म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रापुढे आव्हाने पूर्वापार आहेत. मात्र या आव्हानांशी आपल्याला लढायचे आहे. प्रत्येक काळात या आव्हानांशी त्या-त्या काळातील माणसं लढत आली आहेत. आताच्या आव्हानांशी आपल्याला लढावे लागणार आहे. नवीन पिढी आपल्याकडं काय म्हणून बघणार? आपण काय संस्कार करतोय? या प्रश्नांवर आपल्याला विचार करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.
शोषितांना न्यायासाठी कला वापरावी
त्यांनी सांगितले की, मी भांडू शकतो. यासाठी माझं आयुध आहे कला. एक माणूस काहीही करू शकतो. आपला लढा मूल्यांसाठी आहे. यासाठी आपल्या प्रत्येक कलेतून मी सांस्कृतिक युद्ध सुरू करू शकतो. प्रस्थापितांखाली दबलेल्या वंचित, शोषित घटकांसाठी कला असली पाहिजे. शोषितांना न्याय मिळावा यासाठी कलेचा पुरेपूर वापर व्हावा. यासाठी कलाकारांनी अस्वस्थ असावं. समाज कुठल्याही काळात आहे तसाच असतो, प्रश्न असा आहे की आजच्या काळात तुकाराम, सॉक्रेटिस, बुद्ध आहेत का? असे म्हणत त्यांनी अंतर्मुख
व्हायला भाग पाडले.
सांस्कृतिक दारिद्रय ओळखा
पेठे यांनी सांगितले की, 90च्या आधी एकजिनसी प्रश्न होते. आपल्या काळातील प्रश्न हे बहूजिनसी प्रश्न बनले आहेत. मला काय येत नाही हे बघण्यासाठी माझं नाटक आहे. माझं नाटक हे माझ्यासाठीच. मला भाषेचं, राजकारणाचं, कलेचं आव्हान आहे. सगळ्या प्रकारचं दारिद्र्य समजून येतं मात्र सांस्कृतिक दारिद्रय ओळखणे कठीण. संकुचित विचार न करणे हे सांस्कृतिक क्षेत्रापुढील महत्वाचं आव्हान आहे. शोध घेणे हे आपल्या समाजातच नाही, असे ते म्हणाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला नारायण बाविस्कर, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, अॅड. डी. डी. पाटील, उपप्राचार्य डी. पी. पवार, आर. बी. देशमुख, एस. डी. पाटील, हर्षल पाटील, विनोद रापतवार यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले आभार उदय येशे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोना तडवी, राहुल निंबाळकर, मिलिंद जंगम, सोनाली पाटील, नलिनी जैन यांनी परिश्रम घेतले.