अलविदा अम्मा! तामीळनाडू पोरके

0

चेन्नई – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) पक्षाच्या प्रमुख डॉ. जे. जयललिता यांची मृत्युशी सुरू झालेली झुंज सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संपली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तामिळी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या या लोकप्रिय नेत्याच्या निधनानंतर अख्खे तामिळनाडू शोकसागरात बुडाले. उशिरा रात्री त्यांच्या निधनाची घोषणा झाल्यानंतर लाखोच्या जनसमुदयाने चेन्नईकडे धाव घेतली होती. त्यांच्या पार्थिवाचे या लक्षावधी चाहत्यांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून पार्थिव त्यांच्या पोएश गार्डनस्थित निवासस्थानाच्या नजीक राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, नवनियुक्त मुख्यमंत्री तथा जयललिता यांचे उत्तराधिकारी ओ. पनीरसेल्वम यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मरिना बीचवरील एमजीआर मेमोरियलवर दफनविधी करण्यात आला. तत्पूर्वी राज्याच्यावतीने तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पचक्र अर्पण केले. हिंदूधर्माच्या रितीरिवाजानुसार धार्मिक विधी करण्यात आले. हे विधी जयललितांचे भाचे दीपक, सहकारी शशिकला नटराजन यांच्याहस्ते पार पडले. यावेळी लक्षावधी चाहत्यांनी आक्रोश अन् साश्रुनयनांनी आपल्या आवडत्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. राजाजी हॉल ते मरिना बिच या अंत्ययात्रेच्या मार्गावर अक्षरशः जनसागर लोटला होता.

मुख्यमंत्री धायमोकलून रडले!
जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पनीरसेल्वम यांच्यासह ३१ मंत्र्यांनादेखील मध्यरात्रीच्या सुमारास पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राजाजी हॉल येथे जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. याप्रसंगी ओ. पनीरसेल्वम हेदेखील तेथे हजर होते. मोदी यांना पाहून त्यांना शोक अनावर झाला. त्यावेळी मोदी यांनीही त्यांना छातीशी घेत त्यांचे सांत्वन केले. शेजारीच जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन या होत्या. त्यांचेदेखील अश्रू थांबत नव्हते. त्यांनाही कुरवाळत मोदी यांनी सांत्वन केले. या दोघांचे सांत्वन करताना मोदी हेदेखील भावूक झाले. हे दृश्य लक्षावधी जनता पाहात होती. त्यामुळे समोर उपस्थित जनतेतून जोरदार हुंदके अन् आक्रोश
उमटत होता.

म्हणून त्यांचे दहन न करता दफन!
डॉ. जे. जयललिता या जन्माने हिंदू अय्यंगर ब्राम्हण होत्या. परंतु, त्या जात-धर्मापलीकडे होत्या. पेरीयार, अण्णादुराई आणि एमजीआर या द्रविडीयन नेत्यांचे दफन करण्यात आले होते. कारण, या नेत्यांनी जात-धर्मापलीकडे जाऊन विचार मांडले, कार्य उभे केले होते. त्यामुळे जयललिता यांचेदेखील रितीरिवाजाप्रमाणे दहन न करता चंदनाची पेटी आणि गुलाब पाण्याने, त्यांची आवडती हिरवी साडी नेसवून दफन करण्यात आल्याचे त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी असलेल्या तामिळनाडू सरकारमधील शासकीय सचिवाने दिली. तामिळनाडूतील द्राविडी नेत्यांचा देव, दैवीशक्ती यावर विश्‍वास नाही. परंतु, या नेत्यांना मानणार्‍या चाहत्यांचा मात्र स्मारकं आणि पुतळे यावर विश्‍वास आहे.

तब्बल तीन दशकांपेक्षाअधिक काळ दक्षिणेतील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या डॉ. जे. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. २२ सप्टेंबररोजी त्यांना ताप व अशक्तपणामुळे चेन्नईतील प्रसिद्ध अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक झाली असे वाटत असतानाच त्यांना रविवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. त्यानंतर त्यांच्या हृदयाने काम करणे थांबविले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना वाचविण्यात अपयश आले. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालविल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राज्यभर एकच शोकलहर पसरली. लाखो चाहते छाती पिटवून आक्रोश करत होते. हे कारुण्यरुदन दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून अख्खे जग लाईव्ह पाहत असल्याने सर्व भारतभर शोकलहर पसरली होती. राजकीय दिग्गज, चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लक्षावधी चाहत्यांनी चेन्नईकडे धाव घेतली होती. मंगळवारी दिवसभर त्यांचे पार्थिव राजाजी हॉल येथे ठेवण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुपरस्टार रजनीकांत यांनी पुष्पचक्र वाहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

मान्यवरांकडून शोक व्यक्त, तामिळनाडू, पुद्दूचेरीत दुखवटा
डॉ. जयललिता यांच्या निधनावर देशातील सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. तामिळनाडू सरकारने राज्यात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, केंद्र सरकार व बिहार सरकारने मंगळवारी दिवसभर शासकीय दुखवटा जाहीर केला होता. पुद्दुचेरी या राज्याने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, शासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला होता. तामिळनाडूत तीन दिवस शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री व्यंकय्या नायडू सकाळपासूनच घटनास्थळी हजर होते.

एमजीआर शेजारीच अखेरची विश्रांती!
तामिळनाडूचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एमजी रामचंद्रन हे डॉ. जयललिता यांचे राजकीय गॉडफादर होते. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत अनेक चित्रपटांत सोबत भूमिकाही केल्या होत्या. या दोघांमध्ये अतिशय सलोख्याचे संबंध होते. ते जिवंत असेपर्यंत जयललिता या त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहिल्या. जयललिता यांच्या पार्थिवाचे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे दहन न करता एमजीआरप्रमाणेच दफन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी एमजीआर यांच्या शेजारीच जागा निवडण्यात आली. एमजीआर मेमोरिअल येथे जयललिता यांना धार्मिक विधीत दफन करण्यात आले. हा विधी त्यांच्या राजकीय सहकारी शशिकला यांच्याहस्ते करण्यात आला.

जयललिता होत्या गोरगरिबांच्या अम्मा
अम्मा म्हणजे आई. डॉ. जयललिता या गोरगरिबांच्या आईच होत्या. सहावेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांनी अनेक सामाजिक योजना सुरू केल्या होत्या. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी मुलींना जन्म देणार्‍या महिलांना सोन्याचे नाणे देण्याची योजना सुरू केली होती. तसेच, अम्मा ब्रॅण्डअंतर्गत अनेक लोकोपयोगी योजनाही राबविल्यात. गरिबांना अत्यल्प दरात भोजन, गरिबांसाठी स्वस्तात मीठ देण्यासाठी ‘अम्मा साल्ट’, ‘अम्मा वाटर’, स्वस्तात औषधी देण्यासाठी ‘अम्मा मेडिसिन’, विद्यार्थिनींना सायकल, विद्यार्थ्यांना लॅपटॉप यासारख्या योजनांमुळे त्या कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. सरकार चालविताना त्यांनी सातत्याने गरिबांचा विचार केला. शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान यावर त्यांनी खास करून भर दिला होता. त्यामुळे त्या खर्‍याअर्थाने गोरगरिबांच्या अम्मा ठरल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी आपले मुंडण करून घेतले. महिलावर्गाचा आक्रोश तर काळीज पिळून टाकत होता.