शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर मंगळवारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत कोसळणार्या मुसळधार पाऊसातही त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी गर्दी केली होती. सोमवारी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ते 79 वर्षांचे होते.
बिग बींनी दिला मित्राला अखेरचा निरोप
शशी कपूर यांना 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणने गौरविण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. मुंबईत पाऊस सुरु असल्याने अॅम्बूलन्समधून शशी कपूर यांचे पार्थिव स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. पोलिसांची एक तुकडी यावेळी उपस्थित होती. अंत्यविधीसाठी ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना, करिश्मा कपूरसह सर्व कपूर कुटुंबीय तसेच अमिताभ बच्चनदेखील जीवलग मित्राला निरोप देण्यासाठी आले होते.
कलाकारांनी घेतले अंत्यदर्शन
शशी कपूर यांना शोकाकूल वातावरणात कलाकारांनी अखेरचा निरोप दिला. नसिरुद्दीन शाह, अनिल कपूर, संजय दत्त, राणी मुखर्जी, शक्ती कपूर, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता नंदा, काजोल, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, बोनी कपूर, ऋषी कपूर, राणी मुखर्जी, मकरंद देशपांडे, सचिन पिळगावकर, के. के. मेनन, सलीम खान, शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार यावेळी स्मनाशभूमीत उपस्थित होते. शशी कपूर यांची मुले संजना कपूर आणि करण कपूर यूएसला होती. मंगळवारी सकाळी ती मुंबईत दाखल झाली.