अलिशान जुगार अड्डयावर पोलीस उपअधीक्षकांचा छापा

0

एमआयडीसीत एम.सेक्टरमध्ये कारवाई ; 7 लाख 35 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

जळगाव : पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची शहरात अवैधधंद्याविरोधात वॉश आऊट मोहिम सुरुच असून शनिपेठनंतर त्यांनी एमआयडीसीकडे आपला मोर्चा वळविला आहे. सोमवारी रात्री डॉ. रोहन यांनी पथकासह एम.सेक्टरमधील भारत पेट्रोलियमच्या मागे मोकळ्या जागेत सुरु असलेल्या अलिशान जुगार अड्डयावर छापा टाकला. यात कारवाईत 7 लाख 35 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगार सुरु असल्याच्या अनेक तक्रारी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्याकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने डॉ.रोहन यांनी सोमवारी रात्री एक वाजता त्यांच्या पथकातील सिध्दार्थ बैसाणे, जुबेर तडवी, योगेश ठाकूर, नंदकिशोर धनके, निवृत्ती चित्ते, गणेश नेटके व ईआरटी पथक घेऊन एमआयडीसी गाठले. तेथे रात्रीच्या गस्तीवर असलेले उपनिरीक्षक संदीप पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेत जुगार अड्डयावर धाड टाकली. पोलिसांचे वाहन पाहून जुगारी वाहने सोडून पळत सुटले. त्यात एक जण जखमी झाला. जखमी अंकुश अशोक गवळी (40, रा.गवळीवाडा, शनी पेठ) याला पोलिसांनीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अंकुश याच्याकडून मिळालेल्या नावानुसार पथकातील मुकेश अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरुन त्याच्यासह दीपक सोनार, गजानन हटकर, सचिन सोनार व इतर दहा ते पंधरा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पथकाने 11 दुचाकी, 1 कार, 1 रिक्षा, 1 बॅटरी व पाण्याचा जार असा 7 लाख 35 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.