अलीगडमधील चिमुरडीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहितीचा खुलासा

0

अलीगड: सध्या संपूर्ण देशात उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका अडीच वर्षाच्या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आता या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर येत असून, अनेक यातना देऊन या मुलीची हत्या करण्यात आल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या मुलीच्या हत्ये प्रकरणी आज एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 झाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी जाहीद आणि अस्लम या आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. आज तिसरा आरोपी मेहदी हसन आणि अन्य एका महिला आरोपीला अटक करण्यात आली. जाहीद आणि अस्लम यांनी या मुलीची गळा आवळून हत्या केली. तसेच मेहदी हसन आणि जाहीदच्या पत्नीने त्यांना हत्येसाठी मदत केल्याचे समोर आले आहे.

मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह अस्लमच्या घरी ठेवण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र मृतदेह ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तसेच मुलीचा मृतदेह ज्या ओढणीत गुंडाळलेला होता ती जाहीदच्या पत्नीची होती. तिलाही या हत्या प्रकरणात चौथी आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.