अल्जेरियात लष्करी विमान कोसळले, 257 ठार

0

मृतांमध्ये सैनिकांची संख्या जास्त
सैन्यदलाच्या बॉफेरिक विमानतळावरील भीषण दुर्घटना

अल्जीयर्स : आफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये बुधवारी सकाळी सैन्याचे विमान कोसळले. या दुर्घटनेत 257 जण ठार झाले. मृतांमध्ये सैनिक तसेच सैन्यदलातील कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. सैन्यदलाच्या बॉफेरिक विमानतळावर ही भीषण दुर्घटना घडली.

विमानात सुमारे 257 जण
अल्जेरिया रेडिओने सांगितले की, विमान दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विमानात सुमारे 257 जण होते. अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्सपासून 30 किलोमीटर अंतरावर बॉफेरिक विमानतळ असून पश्चिम सहारा येथे जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हे विमान कोसळून ही दुर्घटना घडली. या विमानातून सैनिकांसोबत काही उपकरणेही नेण्यात येत होती. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 8 वाजता ही दुर्घटना घडली. मदत कार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. घटनास्थळी आग आणि धुराचे लोट दिसत होते. सैन्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, विमानात दहा क्रु मेंबर आणि 247 प्रवासी होते. यापैकी बहुतांश हे सैनिक होते. इयुशिन 2-76 प्रकारचे हे विमान होते.