अल्पमुदत ठेवींतून महापालिकेला मिळाले 50 कोटी

0

पिंपरी-चिंचवड : दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात विविध बँकांमध्ये ठेवल्याने त्यातून महापालिकेला 50 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. यापूर्वी महापालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होते. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिकेच्या चालू खात्यातील रक्कम अल्प मुदतठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी महापालिकेच्या दररोजच्या उत्पन्नावर दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत आहेत.

दररोज कोट्यवधीचे उत्पन्न
महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. हे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणार्‍या उत्पन्ना व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बँकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातो. महापालिका बँकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 व्याज मिळत होते. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्या मध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बँकांचा आर्थिक फायदा होत होता. लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात बँकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

जास्त व्याज असणार्‍या बँकांमध्ये ठेवी
महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बँकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील जास्तीत जास्त व्याजदर देणार्‍या बँकांमध्ये अल्पमुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवींच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 11 लाख 88 हजार 132 रुपये व्याज मिळाले आहे. आजमितीला महापालिकेने विविध बँकांमध्ये एकूण 2 हजार 957 कोटी 92 लाख 81 हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहे. त्याच्या माध्यमातून 205 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपये महापालिकेला मिळाले आहे. यापूर्वी मुदत ठेवींच्या माध्यमातून महापालिकेला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपयांचे व्याज मिळत होते. परंतु, महापालिकेच्या चालू खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये निष्क्रिय पडून होते.