अमरावती -देशात क्राईम वाढत असल्याचे वारंवार घटनेवरून दिसून येत आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शहरातीलच परिचित युवकाने वर्षभरापूर्वी अपहरण केले. या दरम्यान युवकाने अत्याचार करुन गर्भपातही केला. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
विजयकुमार रमेशचंद्र चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्याच हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीला विजयकुमार चौधरीने ६ सप्टेंबर २०१७ ला पळवून नेले होते. पीडित युवतीला गोळ्या देवून तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी म्हणजेच २०१६ पासूनच युवतीचा शाळेस जाता-येता विजयकुमार चौधरी हा पाठलाग करत असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांनी विजयकुमार चौधरीविरुध्द अपहरण, बलात्कार, विनयभंग, गर्भपात करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आता आरोपी विजयकुमार चौधरीचा शोध घेत असल्याची माहिती फ्रेजरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.